गडचांदूर (चंद्रपूर) : चिकन, मटणच्या दुकानांमुळे नागरिकांच्या घराजवळ बाराही महिने दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे. याबाबत वारंवार नगरपालिकेकडे तक्रार केली, मात्र कुठलीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या एका नागरिकाने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कक्षात मृत कोंबड्या, त्यांची अवयवे व कचरा टाकला. यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.
अगोदरच नगरपरिषदेला मुख्याधिकारी नाही. संपूर्ण कारभार प्रभारी मुख्याधिकारीवर सुरू आहे. सध्या तेही पद रिक्त होते. परंतु, ही घटना घडल्याबरोबर तत्काळ सूरज जाधव यांच्याकडे प्रभार देण्यात आला. ते नगरपरिषदेला तत्काळ रुजू झाले व या प्रकरणाची दखल घेऊन पोलिस स्टेशन गडचांदूर येथे त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.
रफीक निजामी यांच्या घराजवळ वाॅर्ड क्र.२ येथे चिकन, मटण विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधी व फेकलेल्या जैविक कचऱ्याचा त्रास होत होता. त्यांनी दुकानदाराने फेकलेली घाण तत्काळ साफ करावी, अशी नगरपरिषदेमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंडी तक्रार केली. विशेष म्हणजे, १६ मार्च २०२० ला नगरपरिषदेने गावातील वेगवेगळ्या परिसरात असलेली चिकन, मटणाची दुकाने एकाच ठिकाणी हलविण्यात येतील, असा ठराव मंजूर केला. परंतु, एवढ्या कालावधीनंतरही जागेअभावी व नगरपरिषद पदाधिकाऱ्यांमधील आपसी मतभेदांमुळे ते काम तसेच खोळंबून राहिले. म्हणून शुक्रवारी संतप्त झालेल्या रफीक निजामी यांनी नगरपरिषद कार्यालयात येत मृत कोंबड्या व त्यांचे अवयव टाकले.
माझ्या घरासमोरील घाणीमुळे मी व परिसरातील नागरिक त्रस्त आहे. तिथे राहणे नागरिकांना कठीण झाले आहे. त्यामुळे घाण साफ करावी व तत्काळ यावर उपाययोजना करावी, यासाठी वारंवार तोंडी तक्रार देत आलो. नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांना फोन करून दुर्गंधी दूर करावी म्हणून सांगत होतो; परंतु कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे मला आज हे कृत्य करावे लागले. जेणेकरून नगरपरिषदेला त्याची जाण होईल.
- रफीक निजामी, त्रस्त नागरिक
माझ्याकडे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास न.प.चा प्रभार देण्यात आला. मी तत्काळ रुजू होऊन सदर व्यक्तीच्या घरी जाऊन मौका चौकशी केली. घराजवळ असलेल्या दुकानावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपणही असा प्रकार पुन्हा करू नये, असे सांगितले. नगरपरिषदेमध्ये घडलेल्या प्रकरणावर सदर व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- सूरज जाधव, मुख्याधिकारी, न. प., गडचांदूर