लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शनिवारच्या रात्री १०.३० वाजता अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. एक तास होऊनही पूर्ववत होण्याची लक्षणे दिसेनात. लोक संतापाने पेटून उठले आणि तेव्हाच शंभराहून अधिक लोकांच्या जमावाने वीज कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यास भाग पाडले. त्याचे झाले असे, की शनिवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होता. मात्र, त्यानंतर तो अचानक खंडित झाला. लोकांनी एक तासभर विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहिली. पण, सुरळीत होण्याची लक्षणे दिसत नव्हती. सध्याच्या एप्रिल महिना सुरू असला तरी तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विजेशिवाय राहण्याची कोणी कल्पनाच करु शकत नाही.एक तासानंतरही वीज येण्याची लक्षणे दिसत नसल्याने लोकांचा संयम सुटला आणि सरळ वीज कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. पाहता पाहता शंभराहून अधिक लोकांचा जमाव वीज कार्यालयासमोर जमला. वीज कार्यालयाचे दार उघडून वीज कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला आणि वीज सुरू करण्याची मागणी केली. मात्र, वीज कर्मचारी दाद देईनात. जमाव अधिकच आक्रमक होत होता. दरम्यान, पोलिसांचे आगमन झाले आणि संतप्त होत असलेल्या जमावास शांत केले. यावेळी वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. ऐन उकाड्यात वीज पुरवठा खंडित हाेत असल्याने नागरिकांची महावितरणवर नाराजी आहे.
काही भागातील वीज सुरू नागभीडच्या अर्ध्या अधिक भागाचा भारनियमनाच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, नागभीड शहरातील काही भागाचा विद्युत पुरवठा सुरू होता, अशी माहिती आहे.
ग्रामीणांचीही वीज कार्यालयावर धावशनिवारी रात्री नागभीडसोबतच ग्रामीण भागाचाही विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. ग्रामीण जनताही या प्रकाराने क्रोधीत झाली होती. नागभीडचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला, याची माहिती सोशल मीडियावरून ग्रामीण जनतेस कळताच आमचाही विद्युत पुरवठा सुरळीत करा, या मागणीसाठी किटाळी, चिंधी चक येथील निवडक लोकांनी वीज कार्यालयावर धाव घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करून घेतला.