भिसी : चिमूर तालुक्यातील भिसी येथील वॉर्ड क्रमांक एक व दोनमधील महिलांनी नळाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ठिय्या मांडला. जोपर्यंत आमच्या नळाचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा पवित्रा मंगळवारी सकाळी ११ वाजता या महिलांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली.
सहा दिवसांपूर्वीही या महिला ग्रामपंचायतीमध्ये नळाच्या पाण्यासाठी ठाण मांडून बसल्या होत्या.
त्यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीपासून नळांना पाणी येत नाही. मुख्य पाइपलाइनवर सात-आठ नागरिकांना कनेक्शन देण्यात आले आहे. शिवाय काही लोक नळाला मोटार लावून पाणी ओढून घेतात. मात्र आमचे नळ कनेक्शन छोट्या पाइपलाइनवरून असल्यामुळे आमच्या नळाला मुळीच पाणी येत नाही, असा आरोप या संतप्त महिलांचा आहे. आम्हालाही मुख्य पाइपलाइनवरून जोडणी द्यावी किंवा सगळ्यांना वितरण लाइनवरून जोडणी द्यावी, अशी मागणी या महिलांची आहे.
तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाला अर्ज देऊनही न्याय न मिळाल्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. भर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करून महिला मेटकुटीस आल्यामुळे महिलांनी अखेर ग्रामपंचायतमध्येच ठिय्या धरला.
ग्रामपंचायतीचा गलथान कारभार
वॉर्ड क्रमांक एकमधील देवीदास कोटनाके यांचा नळ अडीच वर्षांपासून बंद आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाइपलाइन दुरुस्त केल्या जात नाही. एकंदरीत ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा संताप वाढतच चालला आहे. दीड वर्षांपूर्वी वॉर्ड क्रमांक पाच व सहामधील महिला व पुरुषांनी नळाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला होता. ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे नुकसान करत सरपंच योगिता गोहणे यांना मारहाण केली होती. मोर्चेकरी महिला व युवकांवर गुन्हेही दाखल झाले होते.