'दंडा लेकर हल्लाबोल’ आंदोलन
चंद्रपूर : मागील २५ दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोविड योध्द्या कंत्राटी कामगारांना सात महिन्यांचा थकित पगार व किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या डेरा आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले.
दोन दिवसांपूर्वी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेऊन कायदेशीर व शांततेच्या मार्गाने कामगारांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास 'दंडा लेकर हल्लाबोल' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. शुक्रवारी देशमुख यांच्या नेतृत्वात संतप्त कामगारांनी मेडिकल कॉलेजमधील अधिष्ठाता कार्यालयातील काचांची तोडफोड करून 'दंडा लेकर हल्लाबोल' आंदोलन केले. शुक्रवारी दुपारी जुना वरोरा नाका चौक येथून जनविकासचे कार्यकर्ते दंड्याला बांधलेले झाडू हातात घेऊन नारेबाजी करीत मेडिकल कॉलेजच्या दिशेने निघाले. सर्व आंदोलनकर्ते मेडिकल कॉलेजच्या आवारात शिरल्यानंतर थेट अधिष्ठाता कार्यालयात घुसले. याची चाहूल लागताच अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे बाहेर निघून गेले. यानंतर अधिष्ठाता कार्यालयात कामगारांनी प्रचंड घोषणाबाजी केली. कार्यालयातील काचांची तोडफोड सुद्धा करण्यात आली.
कोट
जिल्हाधिकारी कार्यालयापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत सर्वच ठिकाणी शासकीय अधिकारी कंत्राटदाराशी संगनमत करून कंत्राटी कामगारांचे शोषण करतात. कमी वेतनामध्ये जास्त काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नियमानुसार व वेळेवर पगार देण्यात नाही. हा प्रकार बंद न झाल्यास प्रत्येक शासकीय विभागात 'दंडा लेकर हल्लाबोल' आंदोलन करण्यात येईल.
-पप्पु देशमुख, नगरसेवक तथा अध्यक्ष
जनविकास सेना, चंद्रपूर.