घनश्याम नवघडे
चंद्रपूर : प्रत्येक माणूस जन्मजात काही गुणवैशिष्ट्ये घेऊन जन्माला येत असतो आणि त्याची वैशिष्ट्ये त्याची ओळख बनत असते. तालुक्यातील किरमिटीच्या अनिलची त्याच्या उंचीने ओळख तयार होत आहे. आज २६ वर्षे वय असलेल्या अनिलची उंची साडेसात फूट आहे. कदाचित किरमिटीचा हा अनिल नागभीड तालुक्यातील सर्वांत जास्त उंची असलेला व्यक्ती असावा.
अनिल हरिदास रामगुंडे हे त्याचे पूर्ण नाव. सर्वसाधारण मजुरी करणाऱ्या कुटुंबात अनिलचा जन्म झाला. अनिलही मजुरीच काम करतो. अनिलच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही साधारण उंचीच्या असल्या तरी अनिलची उंची एखाद्या बांबूप्रमाणे वाढली असल्याने गावासह परिसरात अनिल चर्चेचा विषय झाला आहे.
परवा अनिल हा नागभीड येथील एका पतसंस्थेत काही कामासाठी आला होता. तेव्हा पतसंस्थेत उपस्थित असलेले नागरिक त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागले. सदर प्रतिनिधीने उत्सुकतेपोटी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता बाहेर गेलो की, लोक असेच माझ्याकडे बघायला लागतात; पण आता सवय झाली असल्याने काहीच वाटत नाही, असे त्याने सांगितले. उंचीचा काम करतेवेळी त्रास होत नाही का, असे विचारले असता झेपेल असेच काम करतो, असे तो म्हणाला. अनिलच्या घराचे दरवाजे सर्वसाधारण उंचीचेच असल्याने अनिलला घरात वाकूनच प्रवेश लागतो.
तीन-चार वर्षांपूर्वी अनिल ब्रह्मपुरी येथे गणपती उत्सव बघण्यासाठी गेला असता त्या उत्सवात येथील एका उंच व्यक्तीने अनिलच्या उंचीसोबत आपल्या उंचीची तुलना केली असता अनिलचीच उंची जास्त होती, अशी आठवण किरमिटी येथील सूरज चौधरी यांनी लोकमतला सांगितली.