शिवधुरा मोकळा करण्याची मागणी
राजुरा : तालुक्यातील चनाखा सांतरी शिवधुरा आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी हा शिवधुरा अडविला. काही शेतकरी धुऱ्यावर खड्डे खोदून शेतात जाण्यास अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देवीदास मून यांनी केली आहे.
विजेच्या लपंडावाने रब्बी हंगाम अडचणीत
सावली : तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी शिवारात विद्युत तारा लोंबकळत आहेत. थोडी हवा आली तरी वीज पुरवठा खंडित होतो. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. कृषिपंपधारक शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करीत आहेत; परंतु विजेअभावी हंगामाची कामे रखडली आहेत.
अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली
पोंभुर्णा : तालुक्यातील स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक वाढली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्लास्टिक पिशव्यांना आळा घालावा
चिमूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
वणी-घुग्घुस मार्गावर अवैध जडवाहतूक
घुग्घुस : वणी मार्गावर जडवाहतूक मोठ्या संख्येने सुरू आहे. त्यामुळे अपघातही घडले आहेत. याच मार्गावर वेकोलीच्या कोळसा खाणी आहेत. त्यामुळे कामगारांची सतत या रस्त्यावर वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती करून जडवाहतुकीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिकांची ताटकळ
गोंडपिपरी : तालुक्यातील बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते; पण बसथांब्यावर प्रवासी निवारे नाहीत. नागरिक व विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.
पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा
सिंदेवाही : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अतिपावसामुळे खरीप हंगामातील धानाचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
रस्ते बांधकामासाठी निधी मंजूर करा
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू असून, १४ व्या वित्त आयोगाचा निधी वापरला जात आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने कामे थांबविल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेकडे निधीची तरतूद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बेरोजगार युवक-युवतींमध्ये निराशा
नागभीड : तालुक्यात हजारो विद्यार्थी पदवीपुढचे शिक्षण घेतात; पण नोकरीची हमी नाही. कोरोना काळात रोजगाराअभावी निराशा वाट्याला येऊ लागली आहे.