लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात कतलीसाठी कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. गडचिरोली जिल्ह्यातून येणारी तिन्ही वाहने लोहारा गावाजवळ ताब्यात घेण्यात आली. यावेळी चार तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, ९८ जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांत कतलीसाठी तीन कंटेनरमध्ये कोंबून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात लोहारा गावाजवळ सापळा रचला. वाहनांची पायलेटिंग करणारा मुख्य म्होरक्या इमरान गोसीर खान (वय ३५, रा. गडचिरोली) याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन-दोन किलोमीटरच्या अंतरावर तिन्ही कंटेनर ताब्यात घेतले. यावेळी वाहनांची तपासणी केली असता, चार ते पाच जनावरांचा मृत्यू झाला होता. यावेळी शेख अकबर शेख चांद शेख मेहबूब शेख इमरान गोसीर खान शेख मेहबूब शेख अलताफ, मुक्तार मुबारक (२७, रा. वाकडी, तेलंगणा) यांच्याविरुद्ध रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात संजय आतकुलवार, प्रांजल झिलपे, रवींद्र पंधरे, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गौरकार, सतीश बगमारे, दिनेश हरडे यांच्या पथकाने केली.