उपमहापौरपदासाठी अनिल फुलझेले यांचे नामांकन दाखलचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या तिसऱ्या महापौर कोण बनणार, याबाबत गेल्या पाच दिवसांपासृून चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून भाजपकडून विवेकनगर प्रभागातून निवडून आलेल्या अंजली घोटेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर होणार, हे जवळपास निश्चीत झाले आहे. बुधवारी त्यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी अनिल फुलझेले यांनी नामांकण दाखल केले आहे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या ६६ जागांसाठी १९ एप्रिलला मतदान झाले. २१ ला मतमोजणी होऊन निकाल लागला. यात भाजपने ३६ जागा जिंकत स्पष्ठ बहुमत सिद्ध केले. त्यामुळे महापौर कोण बनणार, याबाबत शहरवासीयांत चर्चा सुरू होती. भाजपकडून महापौर पदासाठी अनेकजण उत्सुक होत्या. मात्र पक्षाकडून विवेकनगर प्रभागातून निवडून आलेल्या अंजली घोटेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बुधवारी अंजली घोटेकर यांनी सर्व भाजप सदस्यांना घेऊन महानगर पालिकेत जाऊन महापौर पदासाठी नामांकण दाखल केला. महानगर पालिकेत भाजप ३६, काँग्रेस १२, बसपा ८, शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २, प्रहार संघटना १, मनसे २ व अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. यातील अपक्ष ३ व मनसेच्या २ नगरसेवकांचे भाजपला समर्थन मिळाल्याने संख्याबळ ४१ झाले आहे. त्यामुळे काँग्रेस, बसपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहार संघटना हे सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले तरी बहुमताचा आकडा पार करू शकणार नाही. त्यामुळेच अंजली घोटेकर यांची निवड निश्चीत समजली जात आहे.अंजली घोटेकर या गेल्या २५ वर्षांपासून भाजप पक्षात आहेत. पक्षाचे विविध पदे भुषविताना २००१ मध्ये त्या पहिल्यांदा नगर परिषद निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या. मात्र त्यावेळी त्या पराभूत झाल्या होत्या. २००६ मध्ये पुन्हा त्या रिंगणात उतरल्या. मात्र यावेळीही पराभूत झाल्या. दोन वेळा हरल्यानंतरही २०१२ च्या मनपाच्या पहिल्या निवडणुकीत त्यांना टिकीट मिळाली. यावेळी त्या विजयी झाल्या. दुसऱ्या महापौर निवडणुकीच्या वेळी त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र पक्षाची रणनिती बदलल्याने त्यांना महापौर होता आले नाही. मात्र यावेळी महापौर पद ओबीसी महिलासाठी राखीव असल्याने पक्षाने महापौर पदासाठी त्यांची निवड केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)३० ला महापौर व उपमहापौरांची निवडचंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी २६ एप्रिलला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत मनपाच्या नगर सचिव कार्यालयात नामांकन स्वीकारण्यात आले. ३० एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष सभा होणार असून या सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड होणार आहे. तर महापौर व उपमहापौर निवडणुकीनंतर पिठासीन अधिकारी नवनिर्वाचित महापौर यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. महापौरपदासाठी बसपा रिंगणात भाजपाकडून महापौर पदासाठी अंजली घोटेकर यांनी दोन नामांकण दाखल केले आहे. मात्र त्यांच्या विरोधात इंटस्ट्रीयल इस्टेट प्रभागातून बसपाकडून निवडून आलेल्या रंजना यादव यांनीही नामांकण दाखल केले आहे. बसपाने अनपेक्षीतरित्या आठ जागा जिंकल्या होत्या.अनिल फुलझेले बनणार उपमहापौर भाजपाने महापौर सोबतच उपमहापौराचीही निवड केली आहे. तुकूम प्रभाग १ मधून निवडून आलेले अनिल फुलझेले यांची उपमहापौर म्हणून निवड केली असून त्यांनी बुधवारी नामांकण दाखल केला. उपमहापौर पदासाठी एकच नामांकण दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड झाली असून केवळ घोषणेची औपचारिकता उरली आहे.
अंजली घोटेकर बनणार महापौर
By admin | Published: April 27, 2017 12:42 AM