मंत्र्यांना निवेदन : गुरुदेव सेवा मंडळाची मागणीचंद्रपूर: वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा दरवर्षी पुण्यतिथी सोहळा अर्थात सर्वधर्म श्रद्धांजली मौन प्रार्थना गुरुकुंज आश्रम जि. अमरावती येथे तिथीनुसार होत असते. मात्र या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आजवर कधीही दूरदर्शनने केलेले नाही. हे प्रसारण सर्व प्रादेशिक व राष्ट्रीय वाहिनीवरुन व्हावे, अशी मागणी वारकरी श्रीगुरुदेव सेवा मंडळ घुग्घुस शाखेद्वारे चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिष्टमंडळात मंडळाचे अध्यक्ष प्रेमलाल पारधी, सचिव सुरेश ढवस, कोषाध्यक्ष नथ्थूू बलकी, सदस्य ईबादूल सिद्दीकी, बंडू पवार आदींचा समावेश होता. मंडळाच्या ४३ सदस्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मंत्रीमहोदयांना देऊन शिष्टमंडळानी सविस्तर चर्चा केली.अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मुख्य स्थान गुरुकुंज आश्रम असून त्याद्वारे देशभरात मंडळाचे मानवतावादी, परिवर्तनवादी कार्य सुरु असते. या स्थानाला आजवर प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडीत नेहरु, डॉ. राधाकृष्णन, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यासारख्या थोरपुरुषांनी अनेकदा भेटी दिल्या आहेत. राष्ट्रसंतांचे राष्ट्रकार्य अत्यंत महान असून त्यांचे समग्र साहित्य म्हणजे ग्रामविकासाची संजीवनी बुटी आहे. ग्रामस्वच्छता, अस्पृश्यता निर्मूलन, ग्रामविकास, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, गोहत्या बंदी, सामूहिक विवाह यासारखे रचनात्मक कार्य त्यांनी केलेले आहे. याचीही दखल घेण्यात यावी.
राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी सोहळा राष्ट्रीय वाहिनीवरुन प्रसारित व्हावा
By admin | Published: July 23, 2015 12:54 AM