सचिन सरपटवारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय स्वच्छता अभियानातंर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्कृष्ठ स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ मार्च रोजी केंद्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. केंद्रीय नगर विकासमंत्री याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्वोत्कृष्ठ स्वच्छता पुरस्काराचा दावेदार हा बचत गट असण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, दारिद्र्य रेषेखालील या महिला बचत गटातील ११ ही सदस्यांना नगराध्यक्ष अनिल धानोरकर दिल्ली येथे पुरस्कार सोहळ्यासाठी विमानाने घेवून जाणार आहेत. महिलांच्या जीवनातील हा एक आगळावेगळाच प्रसंग असणार आहे. डायनॅमिक रँकीगमधील लोकसहभागाच्या स्पर्धेत भद्रावती पालिकेने देशपातळीवर सर्वोच्च स्थान पटकाविले होते. आता बचत गटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने भद्रावती पालिकेच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.पुरस्कारासाठी भद्रावती पालिकेद्वारे पाच नोंदणीकृत महिला बचत गटांची शिफारस करण्यात आली होती. शिफारस केलेल्या या वस्तीस्तर गटांना धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करणे गरजेचे होते. ही प्रक्रिया पूर्ण करून पाच गट पात्र ठरले. त्यानंतर राज्य शासनाने उन्नती महिला बचत गटाची केंद्र शासनाकडे शिफारस केली. केंद्र शासनाच्या चमुने प्रत्यक्ष पाहणी करून या गटाची पुरस्कारासाठी निवड केली.देशातील २९ राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांमधून महाराष्ट्रातील भद्रावती, उदगिर, हिंगोली व वर्धा नगर परिषद तसेच अकोला, मालेगाव, वसई या महानगरपालिकांची या पुरस्कारासाठी निवड झाली. भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी कार्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या बचत गटांना दिल्ली येथे स्वत: विमानाने घेवून जाण्याचे अभिवचन सप्टेंबर २०१७ च्या महिला मेळाव्यात दिले होते. त्याचीच वचनपूर्ती म्हणून या बचत गटाला २९ मार्चला विमानाने पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला घेवून जाणार आहेत.राज्याच्या संस्कृतीचे दर्शन व्हावे, यासाठी बचत गटाच्या सर्व महिला नववारी पातळ परिधान करून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा बचत गट दारिद्र्य रेषेखालील महिलांचा असून मजुरी करून उपजिविका करणाऱ्या या महिला आहेत. स्वत:ची मजुरी बुडवून शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. या महिलांनी स्वयंप्रेरणेने लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केला. आपला वॉर्ड स्वच्छ केला. विविध उपक्रम राबविले. यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.यामध्ये मानसी देव, छबू कपाट, रेखा वाणी, सुनीता साव, रेखा भेले, नंदा रामटेके, रंजना मुळक, रेहाना शेख यांचा समावेश असून ज्योती लालसरे, सुरेखा आस्वले, रफीक शेख हे अभियान व्यवस्थापक आहेत.स्वप्न साकार झालेगेल्या १० वर्षांपासून आम्ही स्वच्छतेबाबत काम करीत आहोत. त्यानंतर स्वच्छता मोहीमेत ससभागी झालो. वॉर्डातील लोकांनीही आम्हाला मदत केली. एकत्रित काम करण्याचे काय फळ असते ते आज आम्हाला कळले. नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी विनोद जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. पुरस्काराबाबत उत्सुकता वाढली आहे. आयुष्यात विमानवारी पूर्ण होत आहे. नगराध्यक्ष आम्हाला विमानाने दिल्लीत नेणार आहे. आयुष्यात विमानात बसण्याचे स्वप्न ही कधी पाहीले नव्हते.- मानसी देव, अध्यक्ष, उन्नती बचत गट, भद्रावती.- रेहाना शेख, सचिव, उन्नती बचत गट, भद्रावती.
भद्रावतीच्या महिला बचत गटाला राष्ट्रीय उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:47 AM
राष्ट्रीय स्वच्छता अभियानातंर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्कृष्ठ स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.
ठळक मुद्देपंतप्रधानांच्या हस्ते गौरव होणारचंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा