शंकरपूर : चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शंकरपूर बिटामध्ये काल झालेल्या नीलगाय शिकार प्रकरणातील आणखी आठ आरोपींना पकडण्यात वन विभागाला आज शनिवारी यश आले तर दोन आरोपी फरार झाले आहेत. ब्रह्मपुरी सहायक वनसंरक्षक एस.बी. पंधरे यांच्या नेतृत्त्वात शिकार टोळी प्रकरणाचा छडा लागला असून मुख्य आरोपी किसन श्रीरामे (३७), दिवाकर वाघमारे (३५), कवडू नन्नावरे (४५), सोमेश्वर शेंडे (३८) यांना सरकारी वकील उपस्थित नसल्याने रविवारपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. आज दिवसभरात या प्रकरणातील सहआरोपी खापरी येथील विनायक कचरु चव्हाण (३५), पत्रु लक्ष्मण शेंडे (४२), कवडसी येथील नारायण बालाजी बगडे (४७), शंकर संपत घरत (४०), हिरापूर येथील सुनील शंकर मुनघाटे (३८), वंगतम कनिराम नागोसे (४१), जितेंद्र नाना नागदेवते (२८), डोमा येथील संजय आनंदराव किरीमकर (३४) यांना अटक करण्यात आली आहे तर कोलारी येथील जगदीश अलोणे व खापरी येथील रतन रामटेके यांना वृत्त लिहिपर्यंत अटक करण्यात आली नव्हती.या टोळीने यापूर्वी बऱ्याच वन्यप्राण्याची शिकार केल्याचे बयाणात सांगितले आहे. मुख्य आरोपी किसन श्रीरामे याने झुडूपात बसून नीलगाईवर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या. इतर आरोपींनी वन्यप्राण्यांचा रस्ता रोखून ठेवला होता. या आरोपींनी बंदुक कुणाकडून विकत घेतली. याचा तपास वनविभाग करीत आहे. काल जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या, बारुद, बॅटरी, ताराचे सापडे, इलेक्ट्रीक तार, कुऱ्हाड, विळा व इतर साहित्याचा समावेश होता. ज्यांनी नीलगाईचे मांस खरेदी केले. त्यांचे धाबे दणाणले आहे. सहाय्यक वनसंरक्षक पंधरे यांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून वनपरिक्षेत्रधिकारी हुमने, वनपाल कीर्तने, पडवे, ठाकूर, सुरसाऊत, कुळमेथे, नवघरे, ठाकरे, कोडापे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
नीलगाय प्रकरणात आणखी आठ आरोपी अटकेत
By admin | Published: November 22, 2014 10:58 PM