आॅनलाईन लोकमतब्रम्हपुरी (चंद्रपूर) : हळदा येथील वाघाच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच हळदा येथून पाच कि.मी. अंतरावरील पद्मापूर (भुज) येथे शौचासाठी गेलेल्या मधुकर टेकाम (५६) यांच्यावर बुधवारी सायंकाळी वाघाने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे पद्मापूर (भुज) व परिसरातील गावकरी वन विभागाविरोधात खवळले. त्यामुळे पहाटे ४ वाजेपर्यंत तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.यापूर्वी वाघाने हळदा येथील एका गुराख्यावर हल्ला करून जखमी केले होते. त्यावेळी वाघाच्या बंदोबस्तासाठी हळदा गावातील लोकांनी रास्ता रोको आंदोलन करीत तोडफ ोड करून रोष व्यक्त केला होता. या घटनेत ४९ जणांना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणामुळे ग्रामस्थ संतप्त असतानाच बुधवारी सायंकाळी आणखी एक घटना घडली. मधुकर टेकाम सायंकाळी ५ वाजता गावाबाहेर शौचासाठी गेले होते. दरम्यान, येथे आलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.त्याची माहिती गावात पोहोचल्यावर घटनास्थळी जमाव तयार झाला. जोपर्यंत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेहाला हात लावायचा नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. परिस्थिती नियंत्रणबाहेर जात असल्याचे समजल्यावर घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेसी, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, नायब तहसीलदार सुभाष पुंडेकर व नायब तहसीलदार राठोड आदी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांनी मागणी रेटून धरली. गावकऱ्यांनी शेवटी पहाटे ४.३० वाजता शवविच्छेदनासाठी परवानगी दिली. गावकरी रात्रभर घटनास्थळावरवन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत येणार नाहीत, तोपर्यत मृत्यूदेहाला हात लावायचा नाही, या मागणीसाठी गावकऱ्यांनी संपूर्ण रात्रभर ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांनी वाटाघाटी केल्यावर पहाटे ५.३० वाजता समाझोता घडवून आणला. यावेळी ३०० ते ४०० गावकरी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद झोडगे, मोंटू पिलारे व अन्य युवा सहकाऱ्यांनी प्रकारणाला शांत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.वन विभागाची तातडीची मदतमधुकर टेकाम यांना वाघाने जिवानिशी ठार केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला वन विभागाकडून रात्रीच तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी वनरक्षक कार्ले यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी घटनेपासून दूर राहिले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडल्यानंतर गुरूवारी पहाटे ४.३० वाजता तोडगा निघाला. गुरूवारला पद्मापूर (भूज) येथे शांतता आहे पण पोलीस, वन कर्मचारी मात्र तणावसदृश परिस्थितीत कार्यरत आहेत.