लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ज्योतिषशास्त्र शिकविण्यात येणार आहे. यावर्षीपासून हे विद्यापीठ पदव्युत्तर पदवी आणि पदविका देणार आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या चार दशकांपासून ‘फलज्योतिष थोतांड आहे’ हे लोकांना समजावून सांगत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे.
२००१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला होता. तेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीन महिने फलज्योतिष विरोधी अभियान राबविले होते. त्यानंतर हा अभ्यासक्रम रद्द केला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राबविलेल्या अभियानात ज्योतिष्यांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्यासाठी पाचारण केले होते; परंतु कोणीही फलज्योतिष हे शास्त्र आहे, असं सांगू शकले नाही. याउलट जगभरातील १८६ वैज्ञानिकांनी, ज्यात १९ नोबेल पारितोषिक विजेते आहेत, त्यांनी ‘फलज्योतिष’हे शास्त्र नाही. केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेऊ नये, असे पत्रक काढले. आता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करून लोकांना दैववादी बनविण्याचे षडयंत्र करीत आहे. हे षडयंत्र उलथविण्याचा प्रयत्न करून लोकांचे प्रबोधन करण्यात येईल, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी सांगितले.