पोलीस पाटलांची उपस्थिती : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून कार्यशाळेचे आयोजनमूल : अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाराष्ट्र शासनाने अस्तित्वात आणलेल्या जादुटोणाविरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मूल पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस स्टेशन येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेला चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पी.आर. गिरी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी.एम. जाधव, प्रा. कैलास गर्गेलवार, डॉ. संजय कोसनकर, तृप्ती कोसनकर उपस्थित होते.मूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यशाळेच्या माध्यमातून पोलीस पाटलांमध्ये अंधश्रद्धा आणि त्याविरुद्ध कायद्याबाबत माहिती आणि जागृती व्हावी या हेतुने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनातून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी गोंडपिंपरी येथे दारुबंदीचा आढावा घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत एका पोलीस पाटलाने आपल्या गावात दारु विकणारा व्यक्ती जादुटोणा करतो आणि त्याची माहिती दिल्यास तो आपल्या वर जादू करुन मारेल, अशी भीती व्यक्त केली. यामुळे पोलीस खात्यातील महत्त्वाच्या दुवा असलेल्या पोलीस पाटलांमध्येच अंधश्रद्धा पसरलेली असल्याचे पोलीस अधीक्षकांच्या दृष्टीस आल्याने त्यांनी तातडीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांसाठी कार्यशाळा घेण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यातून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकाटे यांनी सांगितली.कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अंधश्रद्धेतून मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असतात. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक आहे, याला ग्रामीण लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धा हेच प्रमुख कारण आहे. त्यासाठी अंधश्रद्धेमधून होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अशा कार्यशाळांचे सतत आयोजन होत राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यशाळेकरिता मूल पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्वच गावातील पोलीस पाटील या कार्यशाळेला उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी.एम. जाधव यांनी महाराष्ट्र शासनाने केलेल्या जादुटोणाविरोधी कायद्याबाबत माहिती देताना भोंदुगिरी करणाऱ्या बाबांच्या कथित चमत्कारांच्या पर्दाफाश करणारे अनेक प्रयोग उपस्थितांपुढे करुन दाखविले. प्राध्यापक कैलास गर्गेलवार यांनी अंगात येण्याचे कारण आणि त्याच्या गैरफायदा घेण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. संजय कोसनकर यांनी पाण्याचा दिवा लावणे, जिभेतून टोकदार त्रिशुल आरपार काढणे, हातावर कापूर जाळून ते तोंडात टाकणे, टोकदार खिळ्यांवर उभे राहणे, असे विविध चमत्कारिक प्रयोग करुन त्यामागील वैज्ञानिक कारणे सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख, कुमरे, मडावी, गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर पिसे यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक गोखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. (शहर प्रतिनिधी)
मूल पोलीस ठाण्यात अंधश्रध्दा निर्मूलन कार्यशाळा
By admin | Published: June 14, 2016 12:33 AM