सहा जण आढळले बाधित
मूल : लॉकडाऊन असताना विना कारणाने वारंवार बाहेर फिरणाऱ्यांवर पायबंद घालण्यासाठी तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी करण्याची योजना आखली आहे. शनिवारी सकाळी राबविलेल्या या मोहिमेत विनाकारण फ़िरणाऱ्या ६८ जणांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यात सहा जण बाधित आढळले.
या मोहिमेमुळे काही वेळातच मूल शहरात स्मशान शांतता निर्माण झाल्याचे दिसून आले.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन असल्याने फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे केले होते. मात्र बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नव्हती. त्यामुळे २५ एप्रिलला मूल तालुका प्रशासन, नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजन तपासणी करण्याची योजना आखली होती. त्यावेळी १३६ नागरिकांना अडवून पत्रकार भवन येथे असलेल्या कोविड तपासणी केंद्रात नेण्यात आले व अँटिजन तपासणी करण्यात आली. तेव्हाही सहा जण कोविड बाधित आढळले होते. दरम्यान, शनिवारी पोलीस निरीक्षक सतिशसिंग राजपूत यांनी पोलिसाच्या मदतीने गांधी चौकात मोहीम राबविली. यावेळी ६८ जणांची कोविड तपासणी करण्यात आली. यात सहा जण बाधित आढळले आहे.