चंद्रपूर : अपुऱ्या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. त्यावर शाश्वत व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शासनाने यावर्षी सिंचन विहिरीचे लक्ष्यांक दिला आहे. या सिंचन विहिरीचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केले आहे.मुख्यमंत्र्यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत २०१५ मध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. शाश्वत सिंचनाची व तत्सम इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २००० कोटी रुपये तरतुद करण्यात आली आहे. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, नागपूर येथे विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या आढावा बैठकी घेण्यात आल्या होत्या. या बैठकाच्या इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा ४ एप्रिल २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आहे. त्यावेळी नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात भूगर्भात उपलब्ध पाण्याची पातळी विचारात घेता शेततळी घेण्यापेक्षा जास्तीत जास्त विहिरी घेण्यात याव्यात, असे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते. त्याला अनुसरून जिल्ह्यामध्ये सिंचन विहिरीसाठी निधी योजनेतर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.विहिरी तयार करण्यासाठी असलेली तरतुद विचारात घेऊन नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० विहिरी, भंडाऱ्यात १ हजार विहिरी, चंद्रपूर जिल्ह्यात ३ हजार विहिरी, नागपूर जिल्ह्यात ५०० विहिरी व गोंदिया २ हजार विहिरी अशाप्रकारे पाच जिल्ह्यांसाठी एकूण ११ हजार विहिरीचा लक्षांक देण्याची बाब शासनाचे विचाराधिन होती. त्यास अनुसरून शासनाने निर्णय घेतला आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
सिंचन विहिरींचा लाभ घेण्याचे आवाहन
By admin | Published: October 28, 2016 12:51 AM