जिवती : शेतकऱ्यांनी सुधारित व देशी बियाण्यांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी केले आहे. कोरडवाहू क्षेत्रातील विशेषत: जिवतीसारख्या अतिदुर्गम व पहाडी तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडिद कपाशी ही पिके घेतली जातात. परंतु दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल बाजारातील बियाणे घेण्यावर अधिक आहे. त्यामुळे बियाण्यावर फार मोठ्या प्रमाणात रक्कम खर्ची केली जाते. वास्तविकता सोयाबिन, तूर, मूग, उडीदसारखे बियाणे हे सुधारित बियाणे आहे.बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासून पुन्हा हे बियाणे पेरता येते. परंतु शेतकरी मात्र तयार बियाणे घेणे पसंत करीत असल्याने पारंपरिक बियाणे नामशेष होत आहेत. पर्यायाने बियाणे कंपन्यांचा फायदा होत आहे. शेतकरी आपले बियाणे व्यापाऱ्यांना विकतात. परंतु पेरणीसाठी शिल्लक ठेवत नाही. ही मानसिकता बदलविणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी व्यक्त केले. जिवती तालुक्यात बीटी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बोंडअळी वगळता रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव मागील पाच वर्षापासून वाढला आहे. हवढे करुनही सरासरी एकरी तीन ते चार क्विंटल उत्पन्न येते.ही परिस्थिती लक्षात घेऊन मागील वर्षी या तालुक्यात एच. डी. पी.एस. अर्थात कपासीची सधन लागवड करण्यात आली. पी.के.व्ही. ०८१ व एनएच६१५ या देशी वाणाची ६० बाय १० से.मी. अंतरावर एकरी चार किलो बियाणे पेरले. उत्पन्न सरासरी एकरी चार ते पाच क्विंटल आले. या वर्षीसुद्धा सूरज या देशी वाणाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. या कपाशीचे बियाणे पुढील हंगामात शेतकऱ्यांना उपयोगात आणता येणे शक्य होणार आहे. ग्राम बिजोत्पादन हा मंत्र शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा अशी विनंती राज वानखेडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सुधारित व देशी बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन
By admin | Published: June 15, 2014 11:28 PM