लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांसाठी पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक मागील महिन्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज करता येणार होते. मात्र, कोरोना संकटामुळे सध्या शाळांना सुटी देण्यात आल्याने शिक्षण विभागानुसार आता तारीख पुढे ढकलली असून, १६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.नामांकित शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता पालकांची इच्छा असते. मात्र, भरमसाट शुल्क असल्यामुळे इच्छा असूनही प्रवेश घेता येत नाही. परंतु आरटीई कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील पालकांचे, आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने जानेवारी महिन्यामध्ये वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार होते. मात्र, मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शाळा पडताळणी झाली नव्हती. त्याकरिता ऑनलाईन अर्जाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, आता १६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पुढील पडताळणी होणार आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आवश्यक- आरटीई कायद्यानुसार गोरगरीब घटकातील विद्यार्थांना शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी शिक्षण विभागाने निकष बदलले आहेत. - पूर्वी कोणत्याही बँकेचे पासबुक रहिवासी म्हणून विचारात घेतले जायचे. पण आता राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबुकच महत्त्वपूर्ण पुरावा मानला जाणार आहे. यासाठी आता पालकांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागणार आहे.