या योजनेसाठी येथील तालुका कृषी कार्यालयाकडे २०१९-२० या वर्षात १८ शेतकऱ्यांच्या वारसांनी दावे दाखल केले होते. ही अपघात विमा योजना २०१५-१६ पासून सुरू करण्यात आली आहे. सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, रस्ते अपघात, विषबाधा, झाडावरून पडल्याने मृत्यू ओढवणे आणि वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांना या अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. कायम अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांच्या मदतीचे या योजनेत प्रावधान आहे. असे असले तरी पुरेशा माहितीअभावी किंवा काही तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहत असल्याचे यासंदर्भात बोलले जात आहे.
जे शेतकरी अपघातात मयत झाले, त्या शेतकऱ्यांच्या वारसदारांकडून कृषी कार्यालयाकडे दावे सादर करण्यात आल्यानंतर हे दावे संबंधित विमा कंपनीकडे पाठविले जातात. या विमा कंपनीने या दाव्यांना मंजुरी दिल्यानंतर सानुग्रहाची ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येते. सादर करण्यात आलेल्या दाव्यांपैकी काही दावे नामंजूरही करण्यात येतात. २०१९-२० या वर्षात १८ शेतकऱ्यांचे दावे नागभीड येथील तालुका कृषी कार्यालयास प्राप्त झाले. या १८ दाव्यांपैकी १२ दाव्यांना मंजुरी मिळाली आहे. चार दाव्यांवर कार्यवाही सुरू असून दोन दावे नामंजूर करण्यात आल्याची माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळणे बाकी आहे, त्यांना लाभ मिळावा म्हणून कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. तो शेतकरी १० ते ७५ या वयोगटातील नसणे, जमिनीच्या सातबारावर नाव नसणे आणि अपघातामध्ये गाडी चालविण्याचा परवाना नसणे या मुख्य बाबी योजनेचा लाभ मिळण्यात अडसर ठरत असल्याची माहिती आहे. मात्र आता योजनेच्या नियमांमध्ये बरीच सुधारणा करण्यात आल्याची माहिती आहे.
बॉक्स
२०२०-२१ साठी सहा प्रकरणे
२०२०-२१ हे आर्थिक वर्ष सुरू होऊन सात महिने झाले आहेत. असे असले तरी या अपघात विमा योजनेसाठी आतापर्यंत सहा प्रकरणे नागभीड तालुका कृषी कार्यालयास प्राप्त झाली आहेत.