लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात विकासाच्या गोष्टी सुरू आहे. विकास कामांमा आमचा अजिबात विरोध नाही. मात्र सोमवारी भूमीपूजन झालेल्या २३१ कोेटी रूपयांच्या अमृत योजनेसाठी चंद्रपूर महानगर पालिकेला २५ टक्के वाटा उचलायचा म्हणजेच ६० कोटी लागणार आहे. मात्र अशी कुठलिही तरतुद मनपाने केली नसताना या योजनेला मंजुरी कशी दिली गेली, असा प्रश्न कॉग्रेसचे उप गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.चंद्रपुरातील बाबूपेठ उड्डाण पुलाचे आतापर्यंत अनेकदा भूमिपूजन झाले. मात्र उड्डाण पुल केव्हा होईल, हे अजूनही सांगता येत नाही. शहरासाठी अमृत योजना मंजूर झाली. यासाठी आठ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करावयाचे आहे. काहींची जागा निश्चित नाही. ५३५ कि.मी.ची नवीन पाईपलाईन टाकावयाची आहे. यामुळे दोन वर्षांचा कालावधी असला तरी बाबूपेठ उड्डाणपुलासारखीच गत चंद्रपूर शहरासाठी असलेल्या ‘अमृत’ नावाच्या नळयोजनेची होईल, असा चिमटाही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी काढला.अमृत योजनेसाठी केंद्र शासन ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के आणि महानगर पालिकेला २५ टक्के वाटा उचलायचा आहे. मनपाला ६० कोटींच्यावर निधी लागणार आहे. मात्र चंद्रपूर मनपाने या निधीची तरतुद करण्याबाबत अद्याप एकही बैठक घेतलेली नाही.या योजनेसाठी २५ टक्के निधीची तरतुदच मनपाने केलेली नाही. महानगर पालिका हा ६० कोटींचा निधी कुठून आणणार. याबाबत अस्पष्टता आहे, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले.पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष नंदु नागरकर, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चौखारे, काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा मतदार संघ प्रमुख महेश मेंढे, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष शिवा राव, आसावरी देवतळे, सुनीता लोढीया, सुभाष गौर, विनायक बांगडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुरेसा निधी नसताना अमृत योजनेला मंजुरी - वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:51 PM