लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. निधीचाही प्रस्ताव मंजूर झाला असून, बृहत आराखडाही तयार झालेला आहे. या अनुषंगाने ४१४ कोटी ७४ लाखांच्या या उपकेंद्राची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सभागृहात केली, अशी माहिती ना. पाटील यांनी एक्सवर दिली. या उपकेंद्रामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता गडचिरोली जाण्याची गरज भासणार नाही, हे विशेष.
उपकेंद्रासाठी चंद्रपूर-बाबूपेठ मार्गावरील जुन्या चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाच्या परिसरात ८ एकर जागाही उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी एक प्रशासकीय इमारत, वसतिगृह, वर्गखोल्या, खेळांची सुविधा आणि गेस्ट हाऊस, अशा अद्ययावत सुविधांनी युक्त हे उपकेंद्र असणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांनी 'लोकमत'ला दिली.
राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. यामुळे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना हे विद्यापीठ सोयीचे झाले. मात्र, या विद्यापीठाचे एक उपकेंद्र चंद्रपुरातही व्हावे, अशी मागणी पुढे येताच पुन्हा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या दृष्टीने हालचाली केल्या. अखेर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्राची घोषणा सभागृहात केल्याने गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्राचा मार्गही आता मोकळा झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.