अखेर रात्री ५० किमी अंतरावरून ‘ते’ आले मदतीसाठी
अनवर खान
पाटण : जिवती तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव, एका झोपडीवजा घरातच कोरोनाने कुटुंब प्रमुखाचा मृत्यू होतो, घरात मृतकाची पत्नी व मुलगाच. कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे भावंड, गावकरी अंत्यसंस्काराला यायला तयार नाहीत, रात्रीचे ११ वाजून गेलेले, याची माहिती पं.स. सभापती महेश देवकते यांना मिळाली. पीपीई किट व इतर साहित्य घेऊन लगेच ते ५० किमीचा प्रवास करून ते त्या गावी पोहोचले. काही युवकांना सोबत घेऊन लाकडे गोळा केली व रात्री १२ वाजता नंतर मृतकावर अंत्यसंस्कार केले.
जिवती तालुक्यातील वणी (बु.) येथे घरातच एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरी पत्नी आणि मुलगा हजर. कोरोनाच्या भीतीने गावातील लोक त्या घराकडे फिरकेनात. सख्खी भावंडेही यायला तयार नाहीत. आता मृतकावर अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्न मृतकांच्या कुटुंबीयांसमोर होता. या परिस्थितीची माहिती जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांना मिळाली. त्यांनी त्यांचे सहकारी मित्र प्रमोद चव्हाण यास सोबत घेऊन पीपीई किट घेऊन गडचांदूरवरून ५० किमी अंतरावरील वणी (बु.) येथील मृतकाचे घर गाठले. मृतदेह एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पत्नी व मुलगा हंबरडा फोडून रडत होते. रात्रीचे ११ वाजले होते. अख्खे गाव घराचे दार लावून गाढ झोपेत होते. सरण ठेवण्यासाठी लाकडे ही गोळा केली नव्हती. कोरोनाग्रस्ताचा मृतदेह ठेवायचा किती वेळ हाही प्रश्न होता. महेश देवकते यांनी गावातील युवक कैलास कुंडगीर, प्रेमसिंग राठोड, आनंद शेलोकर, वशिष्ट गिरी, राम देवकते, हनुमंत कुंडगीर, गोरख कुंडगीर, व्यंकटी कुंडगीर, प्रमोद घोटमुकले, मारोती कुंडगीर यांना सोबत घेतले. गावातून ट्रॅक्टर घेऊन रात्री १२ वाजेपर्यंत लाकडे गोळा केली. ती स्मशानभूमीवर रचून ट्रॅक्टर मृतकाच्या घरी आणले. गावातील तीन युवकांना व मृतकाच्या मुलाला पीपीई किट घालण्यास लावून मृतदेह ट्रॅक्टरमध्ये ठेवला. त्यानंतर त्यांच्या धर्मातील पद्धतीनुसार अंत्यविधी पार पाडून माणुसकी जपली.