चंद्रपूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेने चंद्रपुरातील दादमहल वाॅर्डातील दादमहल येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा येथे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केले. केंद्रामुळे नागरिकांना विविध आरोग्य योजनांचा लाभ घेता येईल, असा दावा मनपाने केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्राचे उद्घाटन केले.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता महेश बारई, उपाभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर, रवींद्र हजारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, माजी उपमहापौर राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, डॉ. आविष्कार खंडारे उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शासनाद्वारे विविध आरोग्यदायी योजना राबविल्या जात आहेत.
आरोग्य या मूलभूत सेवेसाठी दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमी कटिबद्ध आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. योजनेंतर्गत महात्मा फुले आरोग्य सेवेचे विमा संरक्षण हे दीड लाखांपासून ५ लक्षापर्यंत वाढविण्यात आले आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूर महानगरपालिकेने एकूण १२ आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू केली. या केंद्रांवर बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, फोनद्वारे आरोग्य सल्ला देण्यात येते.