राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:54 PM2018-06-12T16:54:29+5:302018-06-12T16:54:37+5:30
भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या गावी येत आहेत. या कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दिल्लीच्या एसपीजी कार्यालयातील अधिकारी या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर - एचएमटीचे तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या गावी येत आहेत. या कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दिल्लीच्या एसपीजी कार्यालयातील अधिकारी या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
राहुल गांधी दिल्लीवरून नागपूरला आल्यानंतर ते हेलीकॉप्टरने नांदेड येथे येणार आहेत. त्यासाठी हेलीपॅडची निर्मिती करण्यात येत आहे. ज्या जागेवर हेलीपॅड तयार करण्यात आले ती जागा यासाठी योग्य आहे की नाही याची ट्रायल आज हेलीकॉप्टर उतवून घेण्यात आली. दादाजींच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर राहुल गांधी शेतकºयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्यात येत आहे. मैदानही साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजूकर यांच्या देखरेखीखाली ही सर्व कामे सुरू आहेत .
राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कुठलीही कसर बाकी राहू नये यासाठी जवळपास ५०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. पोलिसदलाची संख्या लक्षात घेता नांदेडला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्यासारखे दिसत आहे. जि.पो.अ. नियती ठाकर लक्ष ठेवून आहेत.
लोकांत उत्सुकता
दादाजी खोब्रागडे यांचे नाव फोर्ब्स मध्ये आल्यानंतर मोठमोठया नेत्यांनी नांदेडला भेटी दिल्या. मात्र यावेळी दादाजींच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुल गांधीसारखे राष्ट्रीय नेते नांदेड या छोट्या गावात येत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. केवळ नांदेडमध्येच नाही तर संपूर्ण नागभीड तालुक्यात ही उत्सुकता दिसून येत आहे.