शोषित युवा भारत संघटनेची मागणी : जिल्हाधिकारी यांना निवेदन
चंद्रपूर : दलितांवर जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अटक करण्यात यावी याबाबतचे निवेदन शोषित युवा भारत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कटकारस्थान रचून दलित समाजाचे असणारे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवून जेलमध्ये पाठविले. इतकेच नाही तर त्यांच्या पत्नीविरुद्धसुद्धा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना नवी मुंबई येथील तलोजा जेलमध्ये जवळपास एक वर्ष दोन महिने अंडासेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. ज्या खोट्या गुन्ह्यात पीआय घाडगे आणि त्यांच्या पत्नीला परमबीर सिंग यांनी जेलमध्ये पाठविले होते आणि नंतर त्याच गुन्ह्यात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आता याप्रसंगी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे; परंतु आजपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही. याकरिता या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना अटक करून दलित समाजाचे भीमराव घाडगे यांना न्याय मिळवून देण्यात यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. शोषित युवा भारत संघटनेचे सचिव रवी धवन, अध्यक्ष प्रज्योत पुणेकर, शिशुपाल रामटेके, सारंग वाकोडे, शार्दुल गणवीर, सुनील निकुरे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.