लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील प्रदूषणाची तीव्रता मोजण्यासाठी इको-प्रो व वातावरण फाउंडेशनच्या वतीने रामनगर ठाण्यासमोरील सावरकर चौकात कृत्रिम फुफ्फुस लावण्यात आले. यावर चंद्रपुरातील वायुप्रदूषणाची तीव्रता मोजली जात आहे. सात दिवसांतच पांढ-याशुभ्र कृत्रिम फुफ्फुसाचा रंग काळा होऊ लागल्याने चंद्रपूरच्या प्रदूषणाची चिंता अतिशय गंभीर झाल्याची चिंतागुरुवारी सकाळी इको-प्रोच्या चौपाल चर्चा कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली.‘चौपाल चर्चा’ कार्यक्रमात शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व पर्यावरणवादींची उपस्थिती होती. शहरातील वाढते उद्योग आणि प्रदूषण ही समस्या आज बिकट होऊ लागली आहे. परिणामी, येथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना खोकला, दमा, श्वसनाचे आजार होत असून लहान मुलांनाही विळखा घातला आहे. त्यानंतरही अनेक गंभीर आजार होतात आणि वयाच्या ४० वर्षांनंतर अनेकांना अधिक त्रास दिसून येतो, असे मत वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केले. उपाययोजना केल्या नाही तर समस्या गंभीर होण्याचा इशारा दिला. यावेळी डॉ. योगेश सालफळे, डॉ. प्रवीण पंत, डॉ. इरशाद शिवजी, डॉ. रफिक मावानी, डॉ. अमित देवईकर, डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. अनुराधा सालफळे, किशोर जामदार, सदानंद खत्री, प्रशांत आर्वे, राजू जोशी, सुभाष शिंदे, पदमकुमार नायर, सुरेश चोपणे, योगेश दूधपचारे, अभय बडकेलवार, नरेश दहेगावकर, नितीन रामटेके, इको-प्रोचे कार्यकर्ते व वातावरण मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. संचालन बंडू धोतरे यांनी केले.
तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना- शहरातील रहदारीतून जड वाहतूक थांबवावी. बायपास मार्ग करावा. वृक्षारोपणावर भर देऊन सायकलिंग वाढवावी. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुरुवात करावी, रस्ते स्वच्छ करतानाही प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. वृक्ष लावावे, संवर्धन करावे. - डोमेस्टिक कोल बर्निंग टाळावे. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न गंभीरतेने घ्यावा, अशा सूचना मान्यवरांनी केल्या.