चंद्रपूर : नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होण्याच्या तोंडावर येथील स्टॅम्प विक्रेत्यांनी विविध कागपत्रांसाठी आवश्यक असलेल्या १०० रुपयांच्या मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. हे मुद्रांक मिळविण्यासाठी येथील तहसील कार्यालय परिसरातील स्टॅम्प विक्रेत्यांपुढे नागरिकांच्या रांगा लागत आहेत. तासन्तास रांगेत उभे राहुनही अनेकांना शंभर रुपयांचे मुद्रांक मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. दहावी-बारावीचे निकाल नुकतेच लागले. नवीन शैक्षणिक सत्राला लवकरच प्रारंभ होणार आहे. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखल्यांची गरज असते. हे दाखले काढण्यासाठी १०० रुपयांच्या मुद्रांकाची आवश्यकता असते. पालक आणि विद्यार्थ्यांची हिच गरज हेरून येथील मुद्रांक विक्रेत्यांनी शंभर रुपयांच्या मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. काही मोजक्या लोकांना मुद्रांक दिल्यानंतर मुद्रांक संपल्याची ओरड या विक्रेत्यांकडून केली जाते. त्यामुळे शंभर रुपयांचे मुद्रांक घेण्यासाठी आलेल्या अनेक पालकांना आल्यापावली परत जावे लागते. परिणामी प्रवेशासाठी लागणारे दाखले कसे मिळवावे, असा प्रश्न या पालकांपुढे उभा ठाकला आहे. (प्रतिनिधी)
१०० रुपयांच्या मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा
By admin | Published: June 21, 2014 1:26 AM