ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी
देवाडा : राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत सर्व वॉर्डातील नागरिकांना पिण्याचे पाणी नळयोजनेद्वारे उपलब्ध होते. परंतु गावातील काही नागरिक नळयोजनेला टिल्लूपंप लावून पाणी ओढत असल्याने काही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.
देवाडातील ग्रामपंचायतअंतर्गत लोकसंख्या तीन हजार ७००च्या वर आहे. शिवाय नागरिकांना पिण्याचे पाणीबरोबर वेळेवर मिळावे यासाठी काही वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. ५० हजार लिटरचे एक जलकुंभ बांधण्यात आले असून, या जलकुंभाचा मदतीने संपूर्ण देवाडा गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय काही भाग चढउतार असल्याने सारख्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काही ठिकाणी व्हॉल्व्ह बसविले आहेत. सुद्धा गावातील काही लोकांनी स्वत:च्या नळाला टिल्लूपंप लावून पाणी ओढत असल्याने इतर भागात पिण्याचे पाणी मिळत नाही, ही बाब प्रत्येक वॉर्डात जास्त प्रमाणात वाढत असल्याने सर्व वॉर्डातील महिलांनी पुढाकार घेऊन मागील दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. मात्र याबाबतीत ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसून येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने दहा दिवसांच्या आत सदर टिल्लूपंप लावत असलेल्या नागरिकांवर कार्यवाही करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चाचे आयोजन करू, असा इशारा महिला व नागरिकांनी दिला आहे.