ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी
: दुर्लक्ष केल्यास घागरमोर्चा
नवरगाव : ग्रामपंचायत कार्यालय रत्नापूरअंतर्गत सर्व वाॅर्डातील नागरिकांना पिण्याचे पाणी नळयोजनेद्वारे उपलब्ध होते. परंतु, वाॅर्ड नंबर एक आणि वाॅर्ड नंबर पाचमधील काही नागरिक नळयोजनेला मोटारपंप लावून पाणी ओढत असल्याने काही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. अशीच परिस्थिती इतरही वाॅर्डातील आहे.
रत्नापूर ग्रामपंचायतअंतर्गत लोकसंख्या साडेसात हजारांवर आहे. शिवाय, नागरिकांना पिण्याचे पाणी बरोबर मिळावे, यासाठी चार जलकुंभ बांधण्यात आले असून या जलकुंभाच्या मदतीने संपूर्ण रत्नापूर गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय, काही भाग चढउतार असल्याने सारख्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काही ठिकाणी वाल्व्ह बसविले आहेत, तरीसुद्धा गावातील काही नागरिक स्वतःच्या नळाला मोटारपंप लावून पाणी ओढत असल्याने इतर भागांत पिण्याचे पाणीही मिळत नाही. ही बाब वाॅर्ड नंबर एक आणि पाचमध्ये जास्त प्रमाणात वाढत असल्याने या वाॅर्डातील महिलांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतला नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने १ एप्रिलपर्यंत सदर मोटारपंप लावत असलेल्या नागरिकांवर कार्यवाही करावी. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर घागरमोर्चाचे आयोजन करू, असा इशारा कृपाली धारणे, ग्रामपंचायत सदस्य उषा ईश्वर धारणे, माया सहारे, कमल ढोणे, भाविका श्रीरामे व महिलांनी दिला आहे.