सचिन सरपटवार।आॅनलाईन लोकमतभद्रावती : ‘एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय पुका जन्मला.’ संत तुकडोजी महाराज यांच्या या ओळी किती सार्थ आहेत, याचा प्रत्यय भद्रकला महोत्सवात आला. कला हे जीवन जगण्याचे साधन आहे. कलेचा प्रसार झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण जागृत झाले पाहिजे. हाच विचार मनात ठेवून आयोजकांनी भद्रकला महोत्सवाचे आयोजन केले. ऐतिहासीक वरदविनायकाच्या साक्षीने प्रतिभावंतांच्या कलाप्रतिमेचा सन्मान झाला. अन् पोस्टर, रांगोळी, छायाचित्रण व भद्रावतीेतील प्राचीन ठेवा पाहून भारावून गेलेल्या स्वित्झर्लंडच्या अँटोनी बेंगोलीन याने विदेशी पर्यटकांसह पुन्हा भद्रावतीत येण्याची व्यक्त केलेली इच्छा, हे सारेच विलोभनीय होते.साईप्रकाश अकादमी भद्रावतीतर्फे तसेच नगर परिषद भद्रावतीच्या सहकार्याने ऐतिहासीक वरदविनायक मंदिर जवळील आसना तलावासमोरील पटांगणावर भद्रकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवादरम्यान विदर्भस्तरीय पोस्टर रांगोळी स्पर्धा व छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.रांगोळीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. अपंग व्यक्तीला असलेली स्वच्छतेची आवड रांगोळीतून रेखाटण्यात आली. मी करु शकतो, तुम्ही का नाही? हा प्रश्न होता अपंग व्यक्तीचा. अन् शेवटी तो म्हणतो माझेही एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने. धीरज देठे चंद्रपूर यांनी काढलेल्या या रांगोळीला प्रथम बक्षीस मिळाले.ऐतिहासिक विंजासन बौद्ध लेणीतील गौतम बुद्धांच्या मूर्तीचे मेणबत्तीच्या प्रकाशात छायाचित्र काढण्यात आले. यात सुमेध साखरे चिचपल्ली यांच्या छायाचित्रणाला पहिले बक्षीस मिळाले.जगातल्या विविध देशातील नोटा, नाणी व तिकिटांचे प्रदर्शन, ऐतिहासिक चलनासोबत देशविदेशातील चलन व तिकिटांचे संग्रह रूपकिशोर लल्लु कनोजिया नागपूर यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते. मुखपृष्ठ व विविध माध्यमातील व्यक्तीचित्राचे प्रदर्शन सुदर्शन बारापात्रे चंद्रपूर यांच्यातर्फे ठेवण्यात आले. पेन्सील शेडींगमधील कलाकृती प्रदर्शन रवींद्र पाटाळकर (वणी) यांनी ठेवले होते. साई प्रकाश अकादमीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कला प्रदर्शन, विविध कलात्मक वस्तु, बाल, साहित्य व इतर साहित्यिक पुस्तकांचे प्रदर्शन आकर्षित करणारे होते.याप्रसंगी चित्र व शिल्प कलाकार सुरेश मिसाळ व मेकअप मॅन काशिराम मेश्राम यांना भद्रकला भूषण पुरस्कार देण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार महेश शितोळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून स्वित्झर्लंडचे अँटोनी बेंगोलीन, कलकत्ताचे दिबाकर दास, अध्यक्ष प्रकाश पिंपळकर, अॅड. युवराज धानोरकर, विशाल बोरकर, प्रशांत कारेकर, राजू भलमे, कार्याध्यक्ष क्षितीज शिवरकर, सचिव रवींद्र पारखी उपस्थित होते.स्वित्झर्लंडचा अँटोनी भारावलाभद्रावती शहर मला खूप आवडलं. येथील स्वच्छता व ऐतिहासिक स्थळं खरोखरच सुंदर आहेत. मी या ठिकाणी अन्य विदेशी पर्यटकांना नॅरेटिव्ह मुव्हमेंटसाठी लवकर घेऊन येईल, असे स्वित्झलँडचा कलावंत अँटोनी बेंगोलीन याप्रसंगी म्हणाला. प्रकाश पिंपळकर, रवी पारखी, सचीन बेरडे, नरोत्तमदास यांच्या घरी त्याने महाराष्ट्रीय जेवण (पुरणपोळी) घेतले. यात भरीत व भाकरी सर्वाधिक आवडल्याचे तो म्हणाला. ‘नमस्ते भद्रावती’ या मराठी वाक्याने त्याने सुरुवात करीत भद्रावतीच्या आठवणी सोबत नेत असल्याचे सांगितले.
कलाप्रतिमेचा झाला सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:20 PM
‘एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय पुका जन्मला.’ संत तुकडोजी महाराज यांच्या या ओळी किती सार्थ आहेत, याचा प्रत्यय भद्रकला महोत्सवात आला.
ठळक मुद्देमहोत्सवाने भद्रावतीकर भारावले : स्वित्झर्लंडच्या कलावंतांना भरीत-भाकरीचा पाहुणचार