घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : शाळेमध्ये एकतरी शिक्षिका असणे आवश्यक आहे. परंतु, नागभीड तालुक्यात तब्बल १२ शाळा शिक्षिकेविना आहेत. यातील काही शाळा उच्च प्राथमिक आहेत. सध्या महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. अत्याचाराचे हे प्रकार शाळेतही घडत आहेत. यादृष्टीने शासन विविध उपाययोजना करीत आहे. पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शासनाकडून शिक्षिकांची नियुक्ती न करणे हे खरोखरच चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागभीड पंचायत समितीअंतर्गत एकूण ११० शाळा आहेत. बाकी शाळांमध्ये शिक्षिकेची नियक्ती करण्यात आली असली तरी यातील १२ शाळा अशा आहेत की, या शाळांमध्ये शिक्षिकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. ज्या शाळांमध्ये शिक्षिकांची नियुक्तीच करण्यात आली नाही, त्यात देवपायली, बाळापूर बुज, चिकमारा, पाहार्णी, पारडी ठवरे, नवेगाव हुंडेश्वरी, पारडी जाटीन, नवानगर, सोनुली (क.), सोनापूर तु, लखमापूर आणि मेंढा चारगाव या शाळांचा समावेश आहे.
मागील सत्रापर्यंत तर मांगरूड आणि जनकापूर या मोठ्या शाळांमध्ये शिक्षिकेची नियुक्ती नव्हती. या सत्रात या दोन्ही शाळांत शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मिळाली. नाही तर शिक्षिकेविना असलेल्या शाळांची संख्या १४ झाली असती.
बदलीचे धोरण कारणीभूत सन २०१८ पासून ऑनलाइन बदल्यांचे धोरण अंमलात आले आहे. या धोरणात सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. त्यामुळे शाळा महिला शिक्षिकेपासून वंचित राहतात. ऑफलाइन बदलीमध्ये अशी चूक झाली तर मागाहून महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्यात येत होती. ऑनलाइन बदलीमध्ये अशी सोय नाही, अशी कुजबुज शिक्षण वर्तुळात यासंदर्भात ऐकायला मिळाली.
"पाहार्णी गाव मोठे आहे. पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. पटसंख्या १३८ आहे. मात्र, शाळेत शिक्षिका नाही. शाळेत शिक्षिकेची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले."- पुरुषोत्तम बगमारे, उपसरपंच, पाहार्णी