घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड: नागभीड येथे रेल्वेच्या मालकीची २०० एकर जमीन आहे. ही जमीन वापराविना अशीच पडून आहे. या जागेचा सदुपयोग केव्हा होईल असा येथील बेरोजगारांचा प्रश्न आहे.
नागभीड येथून १९०८ साली रेल्वेची सुरुवात झाली. काही दिवसांतच जंक्शनही निर्माण झाले. नागभीडचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन इंग्रजांनी रेल्वे स्थानकाच्या सभोवताली २०० एकर जमीन खरेदी केली. बिलासपूर झोनमध्ये नैनपूरनंतर नागभीड येथेच रेल्वेकडे एवढी जमीन असल्याची माहिती आहे.
इंग्रजांनी नागभीड येथे २०० एकरच्या जवळपास जमीन राखीव करून ठेवली, याच्या मागे त्यांचा काही तरी उद्देश नक्कीच असेल. रेल्वेसंबंधी एखादा कारखाना नागभीड येथे सुरू करण्याचा त्यांचा मानस निश्चित असावा. कारण नागभीड येथे तिन्ही मार्गाना रेल्वेचे जाळे असल्याने नागभीड येथून चंद्रपूर, बल्लारपूर मार्गे दक्षिणेकडे, नागपूरमार्गे उत्तरेकडे, गोंदियामार्गे पूर्वेकडे उत्पादित मालाची वाहतूक सहज शक्य होती. मात्र, इंग्रज जाऊन आता ७५ वर्षाच्या वर कालावधी लोटत आहे, पण या जागेचा कोणताच उपयोग होताना दिसत नाही. म्हणूनच या भागात आजही विनोदाने म्हटले जाते की, इंग्रज आणखी १० ते २० वर्षे या देशात राहायला पाहिजे होते, त्यांनी या जागेवर एखादा प्रकल्प निश्चितच उभारला असता आणि या भागातील बेरोजगारांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या.
सदनिका उभारणार?
- इंग्रज गेले, पण इंग्रजांनी या ठिकाणी एवढी जमीन का आणि कशासाठी खरेदी करून ठेवली, याचा अभ्यास करण्यासाठी कोणीही तसदी घेतली नाही. या रेल्वे गाडीचा थांबा द्या, त्या रेल्वे गाडीचा थांबा द्या या मागणी पलीकडे कुणीही जात नाही हेच या भागाचे मोठे दुर्दैव आहे. आता तर रेल्वेच्या या जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सदनिका उभ्या करण्याचे काम रेल्वे विभागाने सुरू केले आहे.
- भविष्यात नागपूर येथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी नागभीड येथे सदनिका उभारण्याचे नियोजन असल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात आहे.
"जागेची उपलब्धता लक्षात घेऊन येथे रेल्वेसंबंधी विविध प्रकल्पांना वाव आहे. पूर्वी येथे इंजिन दुरुस्ती केंद्र होते. ते बंद करण्यात आले. हे केंद्र पुन्हा सुरू करावे, रेल्वे डब्यांचा कारखाना होऊ शकतो. अशा अनेक प्रकल्पांना वाव आहे. ज्यातून बेरोजगारांना काम मिळेल." - गुलजार धम्माणी, अध्यक्ष व्यापारी संघ नागभीड