प्रवीण खिरटकर
चंद्रपूर : शेतातील गोठ्याजवळ वाघ दिसल्याने एका शेतकऱ्याने आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. वाघ झुडपात असल्याने तो दिसला नाही. काही ग्रामस्थ वाघाच्या अगदी जवळून गेले. वाघाने अचानक ग्रामस्थांच्या दिशेने झेप घेतली. वाघ बघताच समयसूचकता दाखवत दोन युवकांनी क्षणात नदीपात्रात उडी घेतल्याने ते बालंबाल बचावले. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी घडली.
वरोरा तालुक्यातील माढेळी गावानजीक वडगाव हे गाव आहे. गावाच्या शेतशिवारात हरिदास तुराणकर यांना शेतातील गोठ्याजवळ वाघ दिसला. त्यांनी आरडाओरडा करणे सुरू केले. आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली. वाघ झुडपात बसून असल्याने ग्रामस्थांना तो दिसला नाही. वाघाला ग्रामस्थ आल्याची चाहूल लागताच त्याने ग्रामस्थांच्या दिशेने झेप घेतली. त्यावेळी वरोरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा वडगावचे उपसरपंच प्रफुल आसुटकर व शैलेश आसुटकर त्याच्या अगदी जवळ होते. या दोघांनीही लगेच वेणा नदीच्या पात्रात उडी घेतली. त्यात ते जखमी झाले. मात्र त्यांचा जीव वाचला. पळापळीत चार ग्रामस्थ जखमी झाले. घटनास्थळी वन अधिकारी व कर्मचारी पोहोचले.
वाघाला पिटाळण्याकरिता फटाके फोडण्यात आले. घटनास्थळावर वाघाचे पगमार्क आढळून आले. तो अडीच ते तीन वर्षांचा असण्याची शक्यता आहे.
- स्वाती लांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा