बल्लारपूर: तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भागरथी नाल्याजवळील शेतात एक शेतकरी जागलीला गेला होता. दरम्यान, मंगळवारी भल्या पहाटे शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ५ वाजता बामणी (दुधोली) येथील शेतशिवारात घडली. यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.विनोद मोतीराम आलाम (३५) असे जखमीचे नाव असून तो बामणी (दुधोली) येथील रहिवासी आहे. सदर शेतकऱ्यांवर अस्वलाने जबर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला असून मृत्यूशी झुंज देत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र अती रक्तस्त्रावामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले. विनोद आलाम नेहमीप्रमाणे गावाजवळच्या भागरथी नाल्याजवळील शेतात जागलीसाठी गेला. पहाटे ५ वाजता शेताची पाहणी करीत असताना अचानक अस्वलाने त्याचेवर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचवेळी एका ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. हा प्रकार बामणी (दुधोली) चे माजी उपसरपंच संतोष टेकाम यांना देण्यात आली. त्यांच्यासह गावकऱ्यांनी गंभीर अवस्थेत विनोदला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. याची माहिती बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. वडेट्टीवार यांना देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर
By admin | Published: February 17, 2016 12:52 AM