ब्रह्मपुरी : समजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमावरच कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ब्रह्मपुरी पाेलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या हळदा गावात रविवारी दुपारी १२.३० वाजता घडली. पोलिसांनी आराेपीला अटक केली आहे.
तालुक्यातील हळदा येथील आराेपी रामदास सखाराम चिमूरकर (६०) हा गावातील मंदिराजवळील चाैकात विनाकारण शिवीगाळ करीत हाेता. त्या वेळी आराेपीच्या मुलाने तिथे वडिलांना हटकून घरी जायला सांगितले. त्या वेळी आराेपी हा घरी गेला असता मुलाने मला हटकले हा राग मनात ठेवून कुऱ्हाड घेऊन घराबाहेर निघाला. या वेळी नागाे नामदेव राऊत (३८) हा चाैकात उभा होता. त्याने रामदासला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात रामदासने नागाेवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला चढवला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागाेला तत्काळ काही नागरिकांनी रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती ब्रह्मपुरी पाेलिसांना दिल्यानंतर आराेपी रामदास सखाराम चिमूरकर याला अटक केली. भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक अनिल कुमरे, खुशाल उराडे, पवन डाखरे, अनुप कवठेकर हे पाेलीस कर्मचारी करीत आहेत.