चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काहींच्या हातचा रोजगार गेला आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र सकंट कायम आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांना
मदत व्हावी या उद्देशाने येथील नगरसेवक सचिन भोयर यांच्या विनंतीवरून आनंदवन संस्थेतर्फे गरजू लोकांच्या मदतीसाठी मिशन आनंद सहयोग हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत गरजूंना रेशन किट देण्यात आली आहे.
एमईएल तसेच बंगाली कॅम्प प्रभागात मोठ्या प्रमाणात गोरगरीब कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांना मदतीसाठी नगरसेवक सचिन भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेतर्फे मिशन आनंद सहयोग हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे अशा ३२० कुटुंबीयांना दोन हजार रुपये किमतीची रेशन किट पुरविण्यात आली आहे. यासाठी फोर्ड फाउंडेशन या संस्थेमार्फत ही आर्थिक मदत प्राप्त झाली. या सर्व अभियानाला डॉ. विकास आमटे यांचे मार्गदर्शन लाभले असून कौस्तुभ आमटे यांच्या नेतृत्वात अभियान राबविले जात आहे. अभियानाचे नियोजन व व्यवस्थापन रवींद्र नलगिंटवार करीत असून इक्राम पटेल, सौकत खान, सबिया खान, अविनाश कुळसंगे, राजू जिवतोडे आदी आनंदवन कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.