लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त बुधवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची सकाळी ११. ३० वाजताच्या सुमारास भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पथसंचलन करुन मानवंदना दिली. हजारो बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन करून ‘जयभीम’ चा नारा दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने फुलांनी सजविलेल्या रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश ठेवण्यात आले होते. रथावर भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर भंते नागाप्रकाश, भंते धम्मशीला, भंते नागघोष, भंते नागवंश, भंते महाकश्प तसेच भिक्खु संघ आदी स्थानापन्न होते.‘बौद्ध धम्म चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो’, अशा विविध घोषणा देत मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे जवान करीत होते. त्यांच्या मागे भारतीय बौद्ध महासभेचे उपासक व उपासिका रांगेमध्ये चालत होत्या. या मिरवणुकीत पांढरा गणवेश परिधान केलेले पुरूष, महिला व बालके सहभागी झाले होते. शहरातील विविध वार्डातील स्त्री-पुरूषांचे जत्थे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक जटपुरा गेट मार्गाने निघाली. पांढऱ्या गणवेशातील मिरवणूक शांततेचा संदेश देत पुढे जात होती. मिरवणूक पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला मालार्पण करून जटपुरा गेट, पाण्याची टाकीमार्गे मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहोचली. मिरवणुकीत समता सैनिक दलाचे २०० सैनिक सहभागी झाले होते. मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले. ही मिरवणूक ऐतिहासिक दीक्षाभूमीवर पोहचताच भंते नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांचा अस्थिकलश बुद्ध विहारात नागरिकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. त्यानंतर समता सैनिक दलाच्या पथकाने भंते सुरेई ससाई व मान्यवरांना मानवंदना दिली.याप्रसंगी बुद्ध, धम्म, संघ वंदनाचे पठण करण्यात आले. दिवसभर पार पडलेल्या सर्व प्रबोधन सत्रात संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव कांबळे, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, चंदू मेश्राम, कुणाजी आमटे, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर तसेच आंबेडकरी चळवळ, पुरोगामी व परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.धम्म तत्त्वज्ञानातूनच विश्वशांती - भंते सुरई ससाईसंमारंभाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना भंते सुरेई ससाई म्हणाले, नागपूर व चंद्रपूर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म संपूर्ण विश्वात गतिमान केले. विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी धम्म हेच प्रागतिक तत्त्वज्ञान आहे. भंते नागघोष थेरो म्हणाले, बौद्ध धम्म हा जगातील सर्वात मोठा धम्म आहे. हा धर्म नसून एक सामाजिक सिद्धांत आहे. हा धम्म निखळ सहजसत्य आहे. मानव व निसर्गाचे संबंधसूत्र आहे. यासाठीच जगातील बहुतेक राष्टÑाने बुद्धाने आत्मसात केले. भंते नागवंश म्हणाले, बुद्धाचा धम्म केवळ श्रवण न करता तो आचरणात आणला तर धम्मचळवळ अधिक गतिमान होईल. संचालन प्रा. पेटकर यांनी केले व आभार डॉ. विजया गेडाम यांनी केले.भीमसैनिकांचे अस्थिकलशाला वंदनदीक्षाभूमी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध अनुयायांनी विहारात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेत वंदन केले. रात्री उशिरापर्यंत हजारो बौद्ध अनुयायांचे दीक्षाभूमीवर आगमण सुरूच होते.ग्रंथ खरेदीसाठी झुंबडडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व प्रकारची गुलामगीरी नष्ट करून संविधानाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ग्रंथ हेच खरे मार्गदर्शक या तत्त्वावर निष्ठा ठेवून युवक-युवती व विद्यार्थ्यांनी ग्रंथ खरेदीसाठी स्टॉलवर प्रचंड गर्दी केल्याचे यंदा दिसून आले.त्रिशरणाचे करा पालनसकाळी ११ वाजता ‘धम्मक्रांती आणि धम्मदीक्षेची प्रासंगिकता’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी प्रा. कांबळे तर प्रमुख वक्ते नांदेड येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद भालेराव, नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे आदी उपस्थित होते. धम्म तत्त्वज्ञानाकडे जगभरातील नवीन पिढीचे आकर्षण वाढले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा धम्माचा मूळ पाया आहे. त्यामुळे सर्वांनी बौद्ध धम्माचा अंगीकार करून धम्म आणि संघ या त्रिशरणाचे सदोदित पालन करावे, असा सूर परिसंवादात उमटला. प्राचार्य राजेश दहेगावकर यांनी प्रास्ताविक केले.
अस्थिकलश यात्रेने चंद्रपूर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:00 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने फुलांनी सजविलेल्या रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश ठेवण्यात आले होते. रथावर भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर भंते नागाप्रकाश, भंते धम्मशीला, भंते नागघोष, भंते नागवंश, भंते महाकश्प तसेच भिक्खु संघ आदी स्थानापन्न होते.
ठळक मुद्दे६३ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा : समता सैनिक दलाचे पथसंचलन लक्षवेधी