कोरपना :चंद्रपूर - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वपूर्ण गाव असलेल्या वनसडी येथील एटीएम सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी समाज सुधारक फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष ओम पवार व परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
वनसडी येथे गेल्या ४० वर्षापासून बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. कोरपना व वनसडी परिसरातील ही एकमेव राष्ट्रीयीकृत बँक असल्याने पंचक्रोशीतील ७० हून अधिक गावातील नागरिकांचे व्यवहार या बँकेतून चालतात. त्यामुळे नेहमीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खातेदारांची गर्दी असते. चार वर्षांपूर्वी येथे एटीएम सेवा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना चांगली सोय निर्माण झाली होती. मात्र बँक व्यवस्थापनाने आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने हे एटीएम बंद केले. परिणामी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. याठिकाणी येणाऱ्या खातेदारांना तासनतास पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. यात बरेचदा संपूर्ण दिवसही जातो. यात सर्वसामान्य नागरिकांचा वेळही मोठ्या प्रमाणात जातो आहे.
कोरोना काळात तुडुंब गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यातही अडचण निर्माण होत आहे. या अनुषंगाने बँक व्यवस्थापनाने येथे एटीएम सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी आहे.