शेतकरी त्रस्त : रानडुकरांच्या हैदोसामुळे धान पिकांचे नुकसानपोंभूर्णा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मध्यमप्रतीचे धानपिक गर्भाशयात आले असून त्यातून धानपिकाचे लोंबे बाहेर पडत आहेत. मात्र रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून धानपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. त्यामुळे हाती येणाऱ्या पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे. वन्यप्राण्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करुन संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.तालुक्यातील रामपूर दीक्षित, देवाडा खुर्द, कोसंबी रिठ, थेरगाव येथील शेतशिवारामध्ये रानडूकर व इतर जनावरे शिरुन रोवणी केलेल्या धानाची नासाडी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून या परिसरामध्ये पाहिजे, त्या प्रमाणात सिंचनाची सोय नसल्याने केवळ निसर्गावर अवलंबून शेतीचे उत्पादन घ्यावे लागते. यापूर्वी पावसाने बरेच दिवस हुलकावणी दिल्याने मध्यम प्रतीचे धानपीक करपायला लागले होते. परंतु विघ्नहर्त्याच्या स्थापनेच्या दिवशी दमदार पाऊस झाला आणि गर्भात असलेले धानपिकाची लोंबी बाहेर पडायला सुरुवात झाली. तोच पुन्हा शेतकऱ्यांवर रानटी डुकरांच्या हौदोसामुळे नुकसानीचे संकट पुढे आले आहे.यावर्षी अगदी पिकाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. मशागतीनंतर धान पऱ्ह्यांची सुरुवात झाल्यावर पावसाअभावी अनेक दिवस रोवणीची कामे खोळंबली होती. त्यानंतर परत काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाल्याने रोवणी पूर्ण करण्यात आली.त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने धानपीक करपायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना अशा अनेक नैसर्गिक तसेच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असतानाच आता रानटी डुकर हाती आलेले धानपीक नष्ट करीत असल्याने शेतकरी हतबल झाला असून वनविभागाने नुकसानग्रस्तांची चौकशी करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
वन्यप्राण्यांचा उभ्या पिकांवर हल्ला
By admin | Published: September 25, 2015 1:27 AM