दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : बिबट शिकार व अवयव तस्करी प्रकरणी एकूण पाच आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले. वापरलेले साहित्य जप्त केले. प्रकरण मोठे असतानादेखील प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचे वनविभागाने टाळले. वास्तविक तीन दिवसात या प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपी जेरबंद करण्यात आले. यासाठी वनविभागाने पत्रपरिषद घेऊन सर्व माहिती द्यावयास पाहिजे होती. मात्र, तसे न करता उलट प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे काय, असेल तर तो कुणासाठी,असा प्रश्न निर्माण होत आहे. ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. अवयवांची तस्करी करताना सावरला येथे एकाला अटक करण्यात आली. त्यानंतर प्रकरण ब्रम्हपुरी वनविभागाकडे सोपविण्यात आले. वनविभागाने त्या दिशेने उचित तपास करीत पाच आरोपींना अटक केली. या प्रकरणात आणखी किती जणांचा समावेश आहे, आंतरराज्यीय टोळी आहे काय, गुप्तधनासाठी मिशा, दात व नखांचा वापर होणार होता काय, याचा सखोल तपास करणे अनिवार्य होते. वनविभागाने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी वनविभागाने वनकोठडी का मागितली नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रसार माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे काय ? व तो नेमका कुणासाठी करण्यात येत आहे असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावा अशी मागणी वन्यप्रेमी करत आहेत.
वनविभागाचा खबऱ्याच निघाला अट्टल गुन्हेगारग्रामीण भागातील नागरिकांना पैशाचे आमिष दाखवून शिकार करण्यासाठी प्रेरित करायचे. त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी २०-३० हजार रुपये गोळा करायचे व वनविभागाला माहिती देऊन आरोपींना पकडून द्यायचा. वनविभागाकडून बक्षीस मिळवायचा. नंतर आरोपींच्या नातेवाइकांकडून सुटका करण्यासाठी म्हणून पैसे उकळायचा. नंदकिशोर पिंपळे ऊर्फ बाबा ऊर्फ जय श्रीराम बाबा नावाने परिचित असलेला मूळचा चंद्रपूर येथील रहिवासी. त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर तेलंगणामध्ये अनेक गुन्ह्याची नोंद असून, शिकार प्रकरणात तुरुंगातही जावे लागले होते.
आपण जिल्ह्यात एकमेव मानद वन्यजीव संरक्षक आहोत. एरवी वनविभागात कोणतीही घटना घडली तर वनविभागाकडून माहिती देण्यात येते. वन्य प्राण्यांचे शवविच्छेदन किंवा अग्निदाह आमच्या उपस्थितीत करण्यात येते. बिबट शिकार चिंताजनक व फार मोठी घटना आहे. या प्रकरणाची वनविभागाने माहिती द्यायला हवी होती. मात्र, वनविभागाने अद्यापही कोणतीही माहिती दिलेली नाही.- विवेक करंबेळकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रम्हपुरी, चंद्रपूर