मूल : घरी दारूसाठा ठेवल्याच्या कारणावरून रात्री अडीच वाजता बेकायदेशीरपणे घरझडती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारूबंदी समर्थकांना गणवेणवार कुटुंबीयांकडून मारहाण झाल्याची घटना ६ नोव्हेंबरच्या रात्री मूलमध्ये घडली. दरम्यान, झडतीच्या नावाखाली कायदा हातात घेऊन अतिरेक करणाऱ्या दारूबंदी समर्थकांवर कारवाई करावी, अशी तक्रार रमेश गणवेणवार यांनी तर दारूबंदी पुरस्कर्ते विजय सिद्धावार यांनी रमेश आणि नरसिंग गणवेणवार यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात केल्याने पोलिसांनी उभयपक्षाविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे.दारूबंदी समर्थक विजय सिद्धावार यांच्या तक्रारीवरुन मूल पोलिसांनी रमेश गणवेनवार, नरसिंग गणवेणवार व इतरांविरुद्ध कलम ३०७, १४३, २९४, ५०४, १४७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, रमेश गणवेनवार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विजय सिद्धावार यांच्यासह विजय कोरेवार, कल्याण कुमार, दिनेश घाटे, संदोकर, संगीता गेडाम रागिनी आडेपवार व इतरांविरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४९, ४५१, ३५४(अ) (१) २९४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विजय सिद्धावार आणि रमेश गणवेणवार यांच्या एकमेकांविरोधातील तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असली तरी कोणावरही अटकेची कारवाई झालेली नाही. दरम्यान, दारूबंदी समर्थकाचा आव आणून काही मंडळी अधिकार नसताना कायदा हातात घेवून गैरकायद्याच्या मंडळींच्या मदतीने दारू विक्री करीत असल्याचा आळ घेवून घरात शिरणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी प्रकार करून अतिरेक व दहशत पसरवित असल्याचा आरोप नरसिंग गणवेणवार यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)पूर्वसूचना नव्हती - ठाणेदारया संदर्भात पोलीस निरीक्षक विखे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, दारू पकडण्यासाठी कुणी नागरिक गणवेणवार यांच्या घरी धाड टाकायला जात असल्याची पूर्वसूचना आपणास अथवा ठाण्यात दिली नव्हती. मात्र, पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक मेघा गोखरे रात्रगस्तीवर असताना त्यांना दूरध्वनीवरून दारूसंदर्भात माहिती देण्यात आली. मात्र पोलिसांची प्रतीक्षा न करता संबंधितांना स्वत:च घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यातून वाद घडला.घरझडतीचा अधिकार दिला कुणी ?कोणत्याही घराची अथवा प्रतिष्ठानाची झडती घेण्यापूर्वी सर्च वॉरंट असावा लागतो. पोलिसांनाही अशी कारवाई करण्यापूर्वी हा वॉरंट स्वत:कडे बाळगावा लागतो. असे असतानाही दारूबंदी समर्थकांकडून सर्रास घरात शिरून झडती घेण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना घरझडतीचा अधिकार कुणी दिला, असा प्रश्न विचारला जात आहे.
बेकायदेशीर घरझडतीच्या प्रयत्नात दारूबंदी समर्थकांना मारहाण
By admin | Published: November 08, 2015 1:15 AM