राजुरा : राजुरा तालुक्यातील धिडशी या गावी दुपारी घरी कुणी नसल्याची संधी साधून गावातील एका युवकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या धाडशी मुलीने जोरदार प्रतिकार केल्याने आणि मोठ्याने ओरडल्याने शेजारील लोक धावून आले. या घटनेत ही मुलगी जखमी झाली आहे. पळून गेलेल्या सचिन रामचंद्र माणूसमारे (२९) या आरोपीला राजुरा पोलिसांनी शेजारच्या गावातून अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम ३५४, पाेस्को या कलमानुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
रविवारी धिडशी या गावातील बहुतांश शेतकरी पुरुष व महिला शेतावर गेल्या होत्या. ही संधी साधून दुपारी २ वाजता येथील सचिन रामचंद्र माणूसमारे हा युवक एका घरी गेला आणि अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याचे बघून तिच्या घरात जाऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या अल्पवयीन मुलीने जोरदार प्रतिकार करीत मोठ्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेजारचे लोक धावून आले आणि त्यांनी या मुलीला सोडविले. या घटनेत आरोपीने मुलीचा गळा दाबल्याने व मारहाण केल्याने ही अल्पवयीन मुलगी जखमी झाली.
बाॅक्स
आरोपीवर यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा
यापूर्वी सचिन माणूसमारे या आरोपीने नांदा येथे जाऊन एका महिलेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असून न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा इसम असून त्याला हद्दपार करावे, अशी संतप्त गावकऱ्यांची मागणी आहे.