मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये बंद झालेले कारवा येथील देशातील पहिले सफारी पर्यटन ८ महिन्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरपासून सुरू झाले आहे. दोन दिवसांत २० पर्यटकांनी हजेरी लावली आहे. पहिल्याच दिवशी वाघाने दर्शन दिल्यामुळे पर्यटक जाम खूश आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बल्लारशाह वन परिक्षेत्रातील सफारी करण्यासाठी जनताही उत्सुक आहे. कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुशीत सामावलेले आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा, रानकुत्रे या सोबतच २०० पक्षी व फुलपाखरे बघण्याचा आनंद सफारी करणाऱ्यांना लुटता येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी न्यायधीश अजय भटेवरा यांनी वाघाचे दृश्य टिपले. यामुळे पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे.याशिवाय ५० किमीचे जुने बैलगाडी आणि कूप रस्त्याचा वापर करून पर्यटन रस्ते तयार करण्यात आले. सफारी पर्यटनासाठी अनेक कक्षातील मार्गावर कारवा रोपवाटिकापर्यंत रस्त्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. तरीही प्रायोगिक तत्त्वावर एसयूव्ही खासगी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश शुल्क व गाईड शुल्क देऊन या सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येतो. सफारी पर्यटन क्षेत्रात ई-सर्विसेसचे कॅमेरे बसविले असून त्याद्वारे पर्यटकांवर सफारी पर्यटनाच्या घडामोडीवर व वन्यजीव हालचालीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत होते. सफारीसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अमोल कवासे यांच्याकडे बुकिंगची व्यवस्था आहे.
सध्या कारवा जंगल वन्यप्राण्यांच्या झुंडीने सर्वदूर प्रसिद्ध आहे. यासाठी मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील पर्यटक कारवा सफारी सुरू होण्याची वाट पाहत होते. आता सफारी पर्यटन पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. -संतोष थिपे, वन परीक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह