नगरपालिका निवडणूक : उमेदवारांची डेडलाईनसाठी धडपडअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर नगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात होऊ घातली आहे. या निवडणुकीत एका प्रभागातून दोन उमेदवार निवडण्याची मुभा मतदारांना देण्यात आली. शहराचा नगराध्यक्ष थेट मतदारातून निवडण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी भावी उमेदवारांची डेडलाईनसाठी धडपड सुरू झाली आहे. यासाठी मात्र राजकीय पक्षाचे प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे.बल्लारपूर नगरपालिकेवर आजतागायत काँग्रेस पक्ष सत्तारूढ आहे. सत्ता समिकरण बदलण्यासाठी उमेदवार राजकीय पक्षाच्या माध्यमातून आतापासून कामाला लागले आहेत. जनमानसात व मतदारात प्रतिमा उजळ करण्यासाठी धडपड करीत आहेत. येथील नगरपालिकेत एकुण ३२ वॉर्ड असून आगामी निवडणुकीसाठी १६ प्रभागाची रचना होणार आहे. आजघडीला येथील नगरपालिकेत काँग्रेसचे १२, भाजपाचे १०, बसपाचे ४, शिवसेना ३, अपक्ष २ तर एक राष्ट्रवादी काँग्रेस असे एकूण ३२ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. आता मात्र आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षासमोर सत्ता कायम ठेवण्याचे तर भाजपाला सत्ता प्राप्त करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागाची रचना जून ते सप्टेंबरच्या दरम्यान करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र यासाठी डेडलाईन अद्यापही देण्यात आली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शहराचा नगराध्यक्ष थेट मतदारांतून निवड करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याने एका प्रभागातील मतदारांना तीन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. राजकीय पक्षाचे भवितव्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निवडीवर अवलंबून राहणार आहे. यामुळे राजकीय पक्षांना सर्व समावेशक व जनमानसात प्रतिमा उजळ असणाऱ्यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. येथील नगरपाालिकेत अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित असल्याची माहिती आहे. यामुळे राजकीय पक्षांनी आतापासून योग्य उमेदवारांची शोध मोहीम सुरू केली आहे. काँग्रेस, भाजपा, बसपा, शिवसेना, आप, भारिप-बहुजन महासंघ व नवीन निर्मित लोकशाही आघाडी येथील नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय होत असले तरी काँग्रेस व भाजपा वगळता इतरांकडे यासाठी सक्षम उमेदवार देण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जवळपास ९० हजारांवर मतदारांच्या पसंतीच्या उमेदवारावर राजकीय पक्षाना शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. अशात राज्यात आणि केंद्रात सत्ता बदल घडवून आणणाऱ्या भाजपाला मोठी टक्कर द्यावी लागणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्वाचन क्षेत्रातील ही मोठी निवडणूक वैशिष्टपूर्ण ठरणार आहे.बल्लारपूरच्या राजकारणावर चंद्रपुरातील नेत्यांचा प्रभावबल्लारपूर नगरपालिकेच्या सत्ताकारणात आजतागायत चंद्रपूर येथील नेत्यांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. आजघडीला येथील राजकारणात काँग्रेस व भाजपा तुल्यबळ राजकीय पक्ष आहेत. ८० च्या दशकापासून येथील काँग्रेसच्या राजकारणावर माजी खासदार व कामगार नेते नरेश पुगलिया प्रमुख सुत्रदारांची भूमिका पार पाडत आहेत. येथील मतदारांनी त्यांना नेहमी झुकते माप दिले. असेच भाजपाचे आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्यांदा सुधीर मुनगंटीवार निवडून आले. राज्याच्या मंत्रीमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे खाते सांभाळत आहेत. त्यांच्या भोवती येथील भाजपाचे राजकारण चालविले जात आहे. काँग्रेस असो अथवा भाजपा, मात्र येथील राजकारणावर चंद्रपूर येथील मोठ्या नेत्यांचा प्रभाव माजी खासदार नरेश पुगलिया व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून दिसून येत आहे.
राजकीय पक्षाचे प्रभाग रचनेकडे लक्ष
By admin | Published: May 22, 2016 12:36 AM