राजकुमार चुनारकर
चिमूर : दीडशे वर्षाची इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वात गवालिया टँक मैदानावरून ‘भारत छोडो’ हा नारा दिला. या नाऱ्याने संपूर्ण देशात इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष पसरला. हाच नारा चिमुरातील किल्ला मैदानात पोहोचला आणि क्रांतिकारक पेटून उठले. या क्रांतीचे गवालिया टँक व चिमुरातील किल्ला मैदान हे क्रांतीचे शक्तीस्थळ ठरले होते.
अभ्यासक्रमात व्हावा समावेश
विदर्भातील चिमूर (चंद्रपूर), आष्टी (वर्धा), यावली (अमरावती), बेनोडा येथील स्वातंत्र्यसंग्राम इतिहासात अजरामर आहे. पण त्यांची पाहिजे तशी दखल इतिहासकारांनी घेतलेली नाही, अशी खंत जाणकार व्यक्त करतात. चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास सांगते. पण, या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश नसल्याने नव्या पिढीसमोर हा इतिहास प्रभावीपणे येऊ शकला नाही. इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवून १९४२मध्ये चिमूर तीन दिवसांसाठी पहिल्यांदा स्वतंत्र झाले होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.
१३ ऑगस्टला निघाली होती प्रभातफेरी
मुंबईत ८ ऑगस्टला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात गांधींनी केलेली छोडो भारतची गर्जना केली. ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती. करेंगे या मरेंगे हा महात्मा गांधीजींचा आदेशरूपी संदेश चिमुरात ९ ऑगस्टला पोहोचला. १० ऑगस्टला वर्धा येथे अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली. यात इंग्रजांनी जंगलू हमाल या स्वातंत्र्यवीराला ठार केले. ही घटना चिमूर येथील उद्धवराव कोरेकार यांनी प्रत्यक्ष पाहिली.
१२ ऑगस्टला कोरेकार चिमूर येथे येताच त्यांनी गणपत सावरकर यांच्या घरी सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेतली. १३ ऑगस्टला मोठी प्रभातफेरी काढण्याचे ठरले. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून चिमूर येथे घडलेल्या क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांतून क्रांतीची बीजे पेरण्यात आली आणि किल्ला मैदानातून १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमुरात रणसंग्राम पेटला होता. या लढ्याच्या आठवणी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी ताज्या होतात.