चंद्रपूर : जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून तिघांचा मृत्यू झाला असून ३१२ घरांचे तसेच गुरांचे गोठे कोसळले आहे. दरम्यान, ३२१.५१ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ६५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात प्रशासनाने पंचनामे करून आकडेवारी जाहीर केली आहे.
२५ एप्रिल रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या नैसगिक आपत्तीमध्ये जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने पंचनामे केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच दोघेजण जखमी झाले आहे. या वादळामध्ये ६५ पशुधनाची जीवितहानी तसेच पाच पशुधन जखमी झाले आहेत. पावसामध्ये जिल्ह्यातील ३१२ घरांचे व गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. शेती पिकांनाही मोठा फटका बसला असून तब्बल ३१२.५१ हेक्टरवरील शेत पीक जमीनदोस्त झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना व शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी तलाठ्यांमार्फत पंचनामे केले आहे. यासाठी आवश्यक निधीच्या मागणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्याची मागणी केली जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"