कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर कामगारांना कामावर घेण्याचे लेखी पत्र कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी कंपनीला दिले होते. परंतु कोल वॉशरीजचे काम सुरू झाल्यानंतरही कामगारांना कामावर घेण्यास आर्यन कोल वॉशरिज व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. याबाबत कामगारांनी चंद्रपूर येथील कामगार आयुक्तांकडे निवेदनातून जुन्याच कामगारांना कामावर घेण्याची विनंती केली आहे.
राजुरा तालुक्यातील पांढरपौनी आर्यन कोल वॉशरीज कंपनी २०१८ मध्ये काही कारणामुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कामगारांना कामावरून काढण्यात आले होते. जेव्हा कंपनी पुन्हा सुरू होईल, तेव्हा परत जुन्याच कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन कामगारांना दिले होते. परंतु कंपनी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी कामगारांना कामावर घेण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कामगारांत कंपनी विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. आर्यन कोल वॉशरीज सुरू होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. काही जुन्या कामगारांना कंपनीने कामावर घेतल्यानंतर पुन्हा सात कामगारांना कामावर घेण्यास आर्यन कोल वॉशरीज व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. काम उपलब्ध झाल्यानंतर जुन्याच कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरही कंपनी कामगारांना कामावर घ्यायला तयार नाही. १८ वर्ष कंपनीत काम केल्यानंतरही कंपनीने कामगारांना कामावर रुजू करून घेण्यास नकार दिल्याने कामगारांवर अन्याय होत आहे, असा आरोप वासुदेव लोणारे, अनिल भगत, खुशब पिदुरकर, भगवान व्याहाडकर, विनोद मडचापे, अजय जेनेकर व इतर कामगारांनी केली आहे. कंपनीने कामावर न घेतल्यास कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे.याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने आर्यन कोल वॉशरीजचे व्यवस्थापक वर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.