वेकोलि माजरी क्षेत्रीय महाप्रबंधकांशी विविध प्रश्नावर चर्चा
हंसराज अहीर यांनी केली वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा
कूचना : वेकोली माजरी क्षेत्रातील एकोना विस्तारित प्रकल्पासाठी शेतजमीन अधिग्रहित करण्यात आल्या. मात्र काही भूधारकाना पैसे दिले. पण ते अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहे, तर काही जमीनमालकांना अजून काहीच मिळाले नाही. सर्व प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा आहे.
जमिनीमध्ये सिंचनाची सुविधा असतानाही त्यांना सिंचनाचा दर दिला गेला नाही. अशा विविध शेतकऱ्यांच्या समस्याबाबत माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांनी गुरुवारी वेकोलि महाप्रबंधक यांची कुचना येथे भेट घेतली. हा मोठा प्रकल्प असूनही स्थानिक संबंधित अधिकारी प्रकल्पास विलंब करीत असल्याचा खेद व्यक्त केला. तसेच जमिनीचा मोबदला व नोकरी संदर्भात शेतकऱ्यांचा छळ होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांची यावेळी वेकोलिला केल्या.
१ जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या अनेक विषयांवर चर्चा केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या बाबतीत विलंब झाल्याचे मान्य केले असून, येत्या १५ दिवसांत संबंधित प्रकल्पग्रस्तांचे अर्ज, आवश्यक कागदपत्र मागवून कार्यवाही केली जाईल. त्यानंतर नागपूर मुख्यालयाला पाठवून मान्यता मिळाल्यानंतर उर्वरित कार्यवाही करू, असेही क्षेत्रीय महाप्रबंधकांनी सांगितले.
तसेच सिंचित जमिनीचा अहवाल उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर मोबदला देऊ, असे आश्वासन यावेळी चर्चेदरम्यान दिले, असेही अहीर यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ कार्मिक अधिकारी नायर, जोशी, डॉ. अंकुश आगलावे, हसन राव, छोटू पहापले, धनंजय पिंपळशेंडे, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
बॉक्सस्थानिक युवकांवर अन्याय
माजरी क्षेत्रातील ओव्हरबर्डन (ओ.बी.) चे काम करणारे संबंधित ठेकेदार स्थानिक युवकांना कामावर घेत नसल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची त्वरित दखल घेऊन माहिती घ्यावी व सगळ्या ठेकेदारांना राज्य शासनाच्या जी.आरचे पालन करून ८० टक्के स्थानिकांना या कामावर सामावून घेण्याकरिता वेकोलि प्रबंधनाने त्वरित नोटीस काढून आदेश द्यावेत, अशी सूचनाही हंसराज अहीर यांनी क्षेत्रीय महाप्रबंधकांना या चर्चेदरम्यान केली.