नवोदिताचा उपक्रम : २७ मार्चला समारंभचंद्रपूर : नवोदिता चंद्रपूर या संस्थेकडून देण्यात येणारा यंदाचा कलासाधक पुरस्कार गायिका व संगीतज्ज्ञ सुरेखा दुधलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषा दिवस तसेच कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधुन दरवर्षी ज्येष्ठ कलावंताला हा सन्मान प्रदान करण्यात येतो. मात्र या वर्षी काही तांत्रिक अडचणींमुळे मराठी भाषा दिनाऐवजी जागतिक रंगभूमी दिनी म्हणजे २७ मार्च रोजी हा सन्मान सोहळा होणार आहे.मागील सात वर्षांपासून कलाक्षेत्रातील ज्येष्ठ कलासाधकाला कलासाधक सन्मानाने गौरवोन्वित केले जात आहे. यापूर्वी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विलास बोझावार, पंडित श्याम गुंडावार, झाडीपट्टीतील ज्येष्ठ नाट्य कलावंत ज्ञानदेव परशुरामकर, कथ्थक नृत्य साधक भाग्यलक्ष्मी देशकर, चित्रकार चंदु पाठक, ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यिक श्रीपाद जोशी, नाट्यकलावंत व दिग्दर्शक डॉ. जयश्री कापसे गावंडे यांना या सन्मानाने गौरन्वित करण्यात आले आहे. या सोहळयाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, आशालता वाबगावकर, लावणी सम्राज्ञी माया जाधव यांनी चंद्रपुरात हजेरी लावली आहे.यावर्षीच्या कलासाधक सन्मानाच्या मानकरी सुरेखा दुधलकर या चंद्रपुरातील स्वरविहार संगीत विद्यालयाच्या संचालक असुन विख्यात गायिका आहे. पंडित उल्हास कशाळकर यांच्या त्या शिष्या असुन त्यांच्या तालमीत शेकडो विद्यार्थी तयार झाले आहेत. दीनांचा कैवारी या आॅडियो अलम्बला त्यांनी संगीत दिले आहे. यावर्षी या सोहळयाच्या निमित्ताने अनिहा प्रॉडक्शन मुंबई प्रस्तुत ‘अंधारातली स्वगत’ या अनोख्या नाटयप्रयोगाचे सादरीकरण होणार असल्याची माहिती नवोदिताचे अध्यक्ष शरद गुप्ता, प्रशांत कक्कड यांनी दिली आहे. ( जिल्हा प्रतिनिधी)
सुरेखा दुधलकर यांना कलासाधक पुरस्कार जाहीर
By admin | Published: March 01, 2017 12:43 AM