चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ चांदाफोर्टतर्फे भद्रावती येथे गर्भाशय ग्रीवा कॅन्सर जनजागृती मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील डॉ. प्रिया गणेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात डॉ. प्रिया गणेश कुमार यांनी कॅन्सरवर सखोल मार्गदर्शन केले. महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या ग्रीवा कॅन्सरबाबत बोलताना त्या म्हणाल्या, भारतात दरवर्षी जवळपास एक लाख स्त्रियांना हा कॅन्सर होतो. जगात हा कॅन्सर चौथ्या क्रमांकावर आहे. हा कॅन्सर टाळण्यासाठी महिलांनी वयाच्या ३५ व्या वर्षांपासून दर पाच वर्षांनंतर आपली चाचणी करावी. त्यामुळे आपल्याला या रोगांची पहिल्या टप्प्याच्या आत लक्षणे दिसून येतील आणि कर्करोग पसरण्यास आळा घालू शकतो. तसेच या कर्करोगापासून बचावासाठी ह्यूमन पॅपिलोमा ही लस उपयोगी ठरते. ही लस दहा वर्षे ते तीस वर्षांपर्यंत केव्हाही घेता येतात. या लसीच्या तीन मात्रा घेतल्यास बहुतांश प्रमाणात ग्रीवेचा कर्करोगापासून बचाव करणे शक्य होऊ शकते. यावेळी डॉ. समृद्धी आईचवार, क्लब अध्यक्ष शीतल बुक्कावार, सचिव सोनल बुक्कावार, अंजली बिरेवार, अंजली दुद्दलवार, अश्विनी रघुशे, रती पोशेट्टीवार, मीना अंजिकर, प्रनोती पल्लेवार, अर्चना राऊतमारे, स्वाती कुलकर्णी आदी उपस्थित होते.